पेण : मातोश्रीवरून आलेल्या आदेशाचे पालन करणार असून बुधवारी सकाळी रायगडचे जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांचा दूरध्वनी आला व १९१ पेण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे मला जिल्हा प्रमुखांतर्फे आदेश देण्यात आले, अशी माहिती पेणचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. याविषयी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी, संपर्कप्रमुख विलास चावरी यांच्याशीही मी चर्चा केली व त्यांनी ही मला मातोश्रीवरून आलेल्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहेत. त्यानुसार मी १९१ पेण, पाली-सुधागड, रोहा मतदारसंघात शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या पत्रकार परिषदेत त्यांना मिळालेल्या संदेशावरून त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या उमेदवारांची घोषणा केली.याप्रसंगी उपस्थितांमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, शहर प्रमुख सुधाकर म्हात्रे, महिला संघटक दीपश्री पोटफोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. नरेश गावंड यांनी रायगड जिल्ह्यात ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार दिले आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बंडखोरी करत असतील तर आम्हाला ही निवडणुकीला उभे राहावे लागेल असे सांगितले. शिवसेनेच्या ए. बी. फॉर्म विषयी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याचा आदेश आला आहे. त्याच पद्धतीने ए. बी. फॉर्मही आम्हाला दिला जाईल, असेही गावंड यांनी या वेळी सांगितले. शिवसेनेच्या या आक्रमक पावित्र्याने पेण विधानसभा मतदारसंघात शेकाप, भाजप, शिवसेना व काँग्रेस अशा राजकीय पक्षांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासोबतीने इतर अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने निवडणूक चौरंगी ठरण्याची चिन्हे दिसत आहे.
पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेना मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 2:55 AM