नांदगाव/ मुरूड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी मुरूड शहरातील दरबार हॉल येथे संपन्न झाली. उसरोळी जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेकडून जिल्हा उपप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या पत्नी राजश्री मिसाळ या ९७८ मतांनी विजयी म्हणून घोषित करण्यात आले. या जिल्हा परिषद मतदार संघात दुरंगी लढत होती. उसरोळी जिल्हा परिषद मतदार संघात दोन पंचायत समिती गण येतात, त्या जागांवरही शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. उसरोळी पंचायत समिती गणामधून शिवसेनेचे तालुका प्रमुख नीलेश घाटवळ यांच्या पत्नी नीता घाटवळ या १९२ मतांनी विजयी झाल्या. वलके पंचायत समिती गणामधून शिवसेनेचे चंद्रकांत मोहिते हे विजयी झाले. त्यांना ३७१९ मते मिळाली. राजपुरी जिल्हा परिषद मतदार संघात शेकापच्या प्रथमच जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार नम्रता कासार यांनी नवीन अध्याय रचून बहुमताने ही जागा निवडून आणण्यात यश मिळवले आहे. नम्रता कासार यांना ८४५१ मते मिळाली. नम्रता कासार या वावडुंगी ग्रामपंचायत सरपंच असून, आता त्यांनी जिल्हा परिषद सदस्य बनण्याचा बहुमान मिळवला आहे. नांदगाव पंचायत समिती गणामधून आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिता पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांनी ४०२९ मते मिळवित विजय संपादन के ला. राजपुरी गणामधून विद्यमान पंचायत समिती सदस्य अनंता ठाकूर याची कन्या अशीका ठाकूर यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. अशीका ठाकूर यांना ४४०३ मते मिळाली असून, त्या विजयी झाल्या.मुरूड तालुक्यात दोन जिल्हा परिषद सदस्य होते, त्यापैकी एक शिवसेना, तर एक आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे. तर मुरूड पंचायत समितीवर दोन शिवसेना सदस्य, तर दोन आघाडीचे सदस्य निवडून आल्याने कोणत्याही पक्षास मुरूड पंचायत समितीवर बहुमत प्राप्त करता आलेले नाही. त्यामुळे मुरूड तालुक्यातील आघाडी व शिवसेनेतील ही लढत फिफ्टी-फिफ्टीच्या स्वरूपात होऊन कोणासही बहुमत प्राप्त न झाल्याने पंचायत समितीचे सभापतीपद हे बहुतेक चिठ्ठीद्वारे काढून आगामी सभापती बसवला जाणार आहे, असे समजते. (वार्ताहर)
शिवसेना, आघाडी फिफ्टी-फिफ्टी
By admin | Published: February 24, 2017 7:59 AM