अलिबाग : कोरोनामुळे विक्रम-मिनीडोर व्यावसायिकांची उपासमार सुरू आहे. त्यासाठी आवाज उठवायचा अथवा निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्यांना आधार द्यायचा, अशी द्विधा मन:स्थिती आज अलिबागच्या स्थानिक आमदारांची झाल्याचे पाहायला मिळाले.मोर्चा काढू नका, बुधवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची आपण भेट घेऊ, असे आश्वासन अलिबागमधील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी विक्रम-मिनीडोर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांना दिले होते. आमदारांनी शब्द दिल्याने विजय पाटील यांनी आपले आंदोलन मागे घेतले, परंतु बुधवारी सकाळी ११ वाजता पाटील आणि त्यांचे ठरावीक सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमदार दळवी यांची वाट पहात होते. मात्र, आमदार दळवी आले नाहीत. पाटील यांनी दळवी यांना मोबाइलवर फोन केला असता, मी निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी बाहेर आलो आहे, असे सांगितल्याने पाटील यांच्यासह सहकाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. त्यांनी येता येणार नसल्याचे आम्हाला साधे कळवलेही नाही. नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी गेले हे चांगले आहे. मात्र, आधीच स्पष्ट सांगितले असते तर आमचा वेळ वाया गेला नसता. आमचा आता कोणावरच विश्वास राहीलेला नाही. आमची लढाई आता आम्हालाच लढावी लागणार आहे. यासाठी लवकरच रणनीती तयार करण्यात येईल, असे विजय पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.काही कालावधीनंतर विजय पाटील, दिलीप भोईर, प्रमोद म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन दिले. गेल्या ९० दिवसांपासून आमचा रोजगार बुडाला आहे. १२ हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने अटी, शर्तींवर परवानगी दिली आहे. मात्र, चार प्रवासी घेऊन व्यवसायामध्ये नुकसान होत आहे. दिल्ली सरकार आणि आंध्र प्रदेश सरकारने टॅक्सी परमीट असणाºयांना पाच ते दहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, राज्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आपल्याच सत्ताधाºयांच्या विरोधात आंदोलन कसे करायचे असा प्रश्न शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना पडला असेल. याचसाठी त्यांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी राजकीय खेळी केली असेल, अशी चर्चा परिसरात सुरु होती.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार निसर्ग वादळातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी चौल येथे गेलो होतो. कोरोनाच्या कालावधीत, तसेच संचारबंदी असल्याने आंदोलन करू नये, असे मी विक्रम मिनीडोर संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील आणि त्यांच्या सहकाºयांना सांगितले होते. त्यांचा प्रश्न गंभीर असल्याने परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशीही चर्चा केली आहे. गुरुवारी आंदोलकांची भेट घेणार आहे.- महेंद्र दळवी, आमदार
शिवसेनेचे आमदार अडकले कात्रीत; आंदोलकांना टाळून केली नुकसानीची पहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 1:15 AM