रामदास कदम याच्या वक्तव्याविरोधात शिवसैनिकांचा संताप, पोस्टरला जोडे मारत व्यक्त केला रोष
By राजेश भोस्तेकर | Published: September 20, 2022 05:35 PM2022-09-20T17:35:37+5:302022-09-20T17:37:04+5:30
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन
अलिबाग : शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या टीकेबाबत अलिबाग शिवसेनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करून त्याच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसैनिकांनी आपला रोष काढला आहे. रामदास कदम हे गद्दार असून ज्यांनी आपल्या मुलाप्रमाणे वागवले त्याच्या विरोधात अपशब्द काढत असल्याने त्यांच्या या कृतीचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी म्हटले आहे.
रामदास कदम यांचा जाहीर निषेध आणि जोडे मारो आंदोलन अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे जोडो मारो आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष संदीप पालकर, सतीश पाटील, चौल उपसरपंच अजित गुरव, शहर संघटिका प्राची खरवीले, तालुका पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाले होते.
रामदास कदम आणि त्याचा मुलगा योगेश कदम हे शिंदे गटात सामील झाले आहे.
रामदास कदम हे वारंवार ठाकरे कुटुंबाबाबत अपशब्द वापरून टीका करीत आहेत. याविरोधात राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत त्याच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले. यावेळी रामदास कदम याच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.