Mahendra Thorve on Sunil Tatkare : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेली असताना महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद उफाळून आला आहे. महायुतीतील नेत्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. महायुतीतील नेते एकमेकांच्या पक्षांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. एकीकडे मतदारसंघावरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम यांच्यात वाद सुरु आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि सुनील तटकरे हे विश्वासघातकी असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे.
रायगडामध्ये महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली. राष्ट्रवादी पक्ष आणि सुनील तटकरे विश्वास घातकी असल्याचे थोरवे यांनी जाहीर कार्यक्रमात म्हटले आहे. त्यामुळे आता वाद होण्याची शक्यता आहे. याआधी ही थोरवे यांनी वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला तर तटकरे यांचा कडेलोट करावा लागेल, असे धक्कादायक विधान आमदार महेंद्र थोरवे केले होते.
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलता महेंद्र थोरवे यांनी ष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीही विश्वासघात करणारी पार्टी आहे, हे मी आज जाहीरपणाने सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं, हेच त्यांचं काम आहे, हे आज आपण कर्जतमध्ये पाहत आहात. या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्वच विश्वासघातकी आहे," असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं.
"विधानसभेच्या आगामी निवडणुकीत कोणी कितीही मनसुबे आखू द्या. पण कर्जत मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. ज्यांना कोणाला निवडणुकी लढवायच्या आहेत, त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं. युतीचा धर्म पाळायचा नसेल तर मी मागच्या वेळीही सांगितलं आहे की, महायुतीमध्ये राहात आणि महायुतीच्या विरोधात काम करता. त्यावेळी त्यांना आम्ही महायुतीच्या बाहेर पडा," असे आम्ही त्यांना मागील वेळीच सांगितले आहे, असेही महेंद्र थोरवे म्हणाले.