रायगड जिल्ह्यात पेट्राेल-डिझेल दरवाढीच्या विराेधात शिवसेनेने साधला केंद्र सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:45 AM2021-02-06T03:45:58+5:302021-02-06T03:46:33+5:30
petrol-diesel price hike : रायगड जिल्ह्यात शिवसेनेने इंथन दरवाढीच्या विराेधात आंदाेलन केले, तर भाजपने वीजबिलाच्या विराेधात महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदाेलन केले.
रायगड - जिल्ह्यात शिवसेनेने इंथन दरवाढीच्या विराेधात आंदाेलन केले, तर भाजपने वीजबिलाच्या विराेधात महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदाेलन केले. दाेन्ही प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचे असले, तरी भाजपने इंधन दरवाढीच्या विराेधात चुप्पी का साधली आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
अलिबाग मुख्यालयाच्या ठिकाणी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. पेट्राेल, डिझेल आणि सिलिंडरच्या दराचा भडका उडाल्याने, सरकारने तातडीने आकाशाला भिडलेले दर कमी करावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले, तर भाजपने वीजबिलाबाबत अलिबाग येथील महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबाेल करत, टाळे ठाेकाे आंदाेलन केले. महाविरणने ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याच्या पाठविलेल्या नाेटिसा रद्द करा, अशी प्रमुख मागणी केली. यावेळी महावितरण कार्यालयाजवळ पाेलिसांनी आंदाेलकांना राेखले. भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड.मेहेश माेहिते यांनी विविध मागण्यांचे निवेदन महावितरणला निवेदन दिले.
वीजबिल माफी होण्यासाठी अलिबागमध्ये भाजपने आघाडी सरकारच्या विरोधात लाइट बिल कमी करण्यात यावे, म्हणून महावितरण कार्यालयावर, तर दर दिवशी वाढत चाललेल्या इंधन दरवाढ थांबविण्यासाठी भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे अलिबागकरांना राजकीय नेत्यांची परस्पर विरोधातील आंदोलन पाहावयास मिळाली. महावितरणने ३५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून राज्यातील ४ कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे पाप करत आहे, असा हल्लाबाेल भाजपने महावितरण कार्यालयावर केला.
शिवसेनेने तर आक्रमक पवित्रा घेत, थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. केंद्र सरकारने पेट्राेल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमती बेफाम वाढविल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. केंद्र सरकारने तातडीने दर वाढ मागे घ्यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र म्हात्रे, अलिबाग तालुकाध्यक्ष राजा केणी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित हाेेते.
इंधन दरवाढीविरोधात पनवेलमध्ये निदर्शने
पनवेल : पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शहरात शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ठाणा नाका येथून विभागीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारचा निषेध करून प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांना निवेदन देण्यात आले.
देश कोरोनामुळे अडचणी आहे. सर्वसामान्य कुटुंबाचा आर्थिक कणा मोडला आहे. असे असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये दिवसेंदिवस वाढ केली जात आहे हे निषेधार्थ असल्याचे मत यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी मांडले. यावेळी मोदी भक्तांनो, आतातरी जागे व्हा, रद्द करा ..रद्द करा पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द करा अशा आशयाचे फलक शिवसैनिकांनी हाती घेतले होते.
यावेळी शिवसेनेचे सल्लागार बबन पाटील, शिरीष बुटाला, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दीपक निकम, दीपक घरत, अवचित राऊत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
उरणमध्येही केला निषेध
उरण : तालुका शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात शुक्रवारी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. शहर शाखेपासून मोर्चाची सुरुवात झाली. उरण शहरातून बैलगाडीने निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी केंद्र सरकारच्या महागाई, कामगार विरोधी, शेतकरी कायद्याविरोधी धोरणांचा निषेध केला.