शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार - अनंत गीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:54 AM2018-02-03T06:54:05+5:302018-02-03T06:54:17+5:30
अलिबाग - देशातील आणि राज्यातील राजकारण अस्थिर झालेले आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुका कधीही झाल्या, तरी स्वबळावर लढून २५ खासदार आणि १५० आमदार हे शिवसेनेचे निवडून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा वाटा मोठा असला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले. अलिबाग-मुरु ड विधानसभा क्षेत्रासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन अलिबाग येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी गीते बोलत होते. रायगड जिल्ह्याच्या सातही विधानसभा क्षेत्रामध्ये अशाच निर्धार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२३ जानेवारी रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार आगामी सर्व निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचे गीते यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या भ्रष्ट कारभाराला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या विरोधात त्यांना उमेदवारच सापडणार नाही. विधानसभेच्या सातही जागा काबीज करण्यासाठी रायगडातील जनतेने तयार राहावे, असेही आवाहन गीते यांनी केले.
रायगड जिल्ह्यासह राज्यातील जनतेसाठी आणि औद्योगिकीकरणासाठी घेतलेल्या जमिनी सरकारकडे पडून आहेत. प्रकल्पासाठी जमिनी घेऊन त्या जमिनींवर एमआयडीसीचा शिक्का बसला, तो काढून टाकण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात आगामी काळात बेरोजगारी दूर करण्यासाठी जिल्ह्यात रोजगार मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात आलेल्या बेरोजगारांना त्याच ठिकाणी नेमणुकीची पत्रे देण्यात येतील, अशी घोषणा सुभाष देसाई यांनी केली. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा असणारा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग पुढाकार घेईल.
उमटे धरणाच्या पाणी योजनेसाठी आवश्यक असणारे फिल्टर
प्लांट उद्योग विभागामार्फत उभारण्यात येणार असल्याचे देसाई यांनी जाहीर केले.
टोकरे येणार शिवसेनेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे हे भाजपामध्ये जाणार अथवा शिवसेनेमध्ये, याची चर्चा गेले काही महिने सुरू आहे; परंतु टोकरे यांचा शिवसेना प्रवेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित लवकरच घेण्यात येईल, असे गीते यांनी स्पष्ट केल्याने टोकरेंच्या पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.