शिवसेना स्वबळावरच लढणार- सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:31 AM2018-04-09T02:31:01+5:302018-04-09T02:31:01+5:30
महाराष्ट्र राज्याच्या राजकीय तख्तावर शिवसेना स्वबळावर लढणार असून यापुढे भाजपाशी कदापि युती करणार नाही.
पेण : महाराष्ट्र राज्याच्या राजकीय तख्तावर शिवसेना स्वबळावर लढणार असून यापुढे भाजपाशी कदापि युती करणार नाही. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असून विधानसभेवर एकहाती सत्ता येण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वज्रनिर्धार मेळावा झाला असून निवडणुका कधीही जाहिर होवोत प्रत्येक शिवसैनिक विधानसभेवर भगवा फडकविण्यास सज्ज झाला आहे. रायगडातील लोकसभा व सात विधानसभा मतदार संघात भगवा फडकेल. हा आत्वविश्वास पेणच्या निर्धार मेळाव्याची उपस्थितीवरून लक्षात येते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याने भाजपाच्या पोटात भितीचा गोळा उठला असून मुंबई बीकेशी येथे झालेल्या भाजपा मेळाव्यात भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी राम शत प्रतिशत भाजपची भूमिकेला बगल देत एनडीएचे सरकार येणार ही भाजपाची बदललेली भूमिका पुतण मावशीचे प्रेम आहे.
शिवसेना यांचे मनसुबे ओळखून आहे. आम्ही शिवसैनिक विधानसभेवर भगवे तोरण बांधण्याचा निर्धार केलेला आहे. तो पूर्ण करण्यासाठीच निर्धार मेळावा आहे. शिवसेना सत्तेत राहून जनहिताचे प्रश्न मार्गी लावते आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही सत्तेत आहोत. ज्यावेळी उद्धव ठाकरे आदेश देतील त्या क्षणी सत्ता सोडून परंतु भाजपाशी सोयरिक करणार नाही, अशा घणाघाती शब्दात शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपावर हल्लाबोल चढविला.
पेणच्या नगर पालिका मैदानावर शिवसेनेचा निर्धार मेळावा शनिवारी सायंकाळी ६ वाजता सुरू झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री अनंत गीते, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, किशोरीताई पेडणेकर, शिवसेने उपनेते विजय कदम, संजय मोरे, बबन पाटील, किशोर जैन, शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पं. स. सभापती, सदस्य, सरपंच, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, युवा सेना, महिला आघाडी प्रमुख विभागावर पदाधिकारी व चार ते पाच हजार शिवसैनिकांची निर्धार मेळाव्यास उपस्थिती होती.
शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना सुभाष देसाई यांनी पेण मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करून मुंबई, नवी मुंबई, उरण जेएनपीटी व पनवेल महानगर पालिका क्षेत्रात विस्तारीत असलेले औद्योगिककरण व नागरीकरणामुळे विकासाचा वेग वाढला आहे. पोर्ट टर्मिनल, पेण-अलिबा व पेण-रोहा रेल्सेसेवा, मुंबई’गोवा राष्टÑीय महामार्ग रुंदीकरण प्रगतीपथावर असल्याचे यावेळी सांगितले. या मेळाव्याची संपूर्ण जिल्हयात चर्चा सुरू आहे.