Aditi Tatkare: महाविकास आघाडीत बिघाडी? आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटविण्यासाठी शिवसेनेची मोहिम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 07:07 PM2022-02-10T19:07:04+5:302022-02-10T19:07:24+5:30
Aditi Tatkare: महाविकास आघाडीत बिघाडी? आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटविण्यासाठी शिवसेनेची मोहिम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांना हटवण्यासाठी शिवसेनेची मोहीम
मनमानी कारभारा विरोधात तीनही आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीमधील प्रमुख घटक पक्षामधील कुरबुरी वाढल्या आहेत. दोन्ही पक्षात टोकाचे मतभेद झाल्याने रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीच बदलावा या दिशेने शिवसेनेने मोहिम आखली आहे. याबाबत महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे या मनमानी कारभार करत असल्याचा थेट आरोप शिवसेनेने केला आहे. रायगडसाठी शिवसेनेचाच पालकमंत्री पाहीजे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे. रायगडच्या पालकमंत्री यांना बदलावे यासाठी शिवसेनेचे तिन्ही आमदार एकवटले आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आज पत्रकार परिषदेत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. यावरून जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाल्याचे यावरून दिसून येते. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकां विरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर आता शिवसेनेच्या आमदारांनी शड्डू ठोकल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे या मनमानी कारभार करत आहेत. सहकारी म्हणून कोणत्याही कामात विश्वासात घेत नाहीत, असा आरोप आमदार गोगावले यांनी केला. महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ देखील पूर्ण होत आहे त्याकरिता मंत्रिमंडळ फेररचनेत रायगड चे पालकमंत्री पद शिवसेनेकडे असावे मग तो शिवसेनचा पालकमंत्री कोणीही द्या तो आम्हाला मान्य असेल. आज माणगाव पासून रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री हटाव मोहिमेला सुरुवात झाली असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. याबाबत जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे सोबत असल्याचा दावा गोगावले यांनी केला.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसचे सरकार असल्याने सर्वसमावेशक कारभार होणे अपेक्षीत होता मात्र तसे होत नसल्याचे आमदार गोगावले यांनी सांगितले. सत्तेमध्ये असतानाही शिवसैनिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे आमदारांसह शिवसेनेचे पदाधिकारी देखील पालकमंच्या काराभारावर नाराज आहेत. त्यामुळे ही नाराजी वर्षावर पोहोचवली जाईल असेही आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, राजीव साबळे, माणगावचे नव निर्वाचित नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, प्रमोद घोसाळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तोंडावर दोन्ही पक्षातील संघर्ष हा शिगेला पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आता वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.