शिवसेनेची बांधिलकी जनतेप्रति
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 11:15 PM2019-10-19T23:15:11+5:302019-10-19T23:15:20+5:30
उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन । श्रीवर्धन येथील र. ना. राऊत विद्यालयाच्या प्रांगणात सभा
श्रीवर्धन : सेना-भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत विविध कामांना चालना दिली आहे. आम्ही सत्तेत असूनसुद्धा अनेकदा जनतेचे हित लक्षात घेऊन सरकारला विरोध केला. शिवसेनेची बांधिलकी जनतेप्रति आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी के ले. श्रीवर्धन येथील र. ना. राऊत विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. तर उरण मतदारसंघातही सभा घेत त्यांनी शरद पवार, राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.
या वेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत महाड विधानसभेवर भगवा फडकेलच; परंतु श्रीवर्धनसुद्धा भगवेमय झाले पाहिजे. शिवरायांच्या महाराष्ट्रातील रायगडवरील भगवा पुन्हा फडकला पाहिजे, असे उद्गार काढले. शिवसेनेने अभ्यासपूर्ण वचननामा तयार केला आहे. त्यामध्ये समाविष्ट सर्व बाबींची पूर्तता आम्ही करू, असे आश्वासन दिले. आज राज्यातील सर्वसामान्य व्यक्तीच्या गरजा लक्षात घेता शिवसेनेने आश्वासक भूमिका घेतली आहे. आगामी काळात लवकरच अयोध्येत राममंदिर बांधू, असे सांगून शिवसेना हिंदुत्वाचे समर्थन करते, त्याचसोबत देशावर प्रेम करणाऱ्या सर्व मुस्लीम समाजातील लोकांना शिवसेना आपली मानते. आज अनेक जाती-धर्माचे लोक शिवसेनेत आहेत. जाती-पातीचे राजकारण आम्ही कधी केले नाही व करणारसुद्धा नाही.
जनतेला दिलेल्या आश्वासनात एक रुपयात आरोग्य चाचणी व दहा रुपयांत सकस जेवणाची थाळी आम्ही लवकरच सुरू करू, असे अश्वासित केले. त्याचसोबत विरोधी उमेदवार भावनिक आवाहन करत आहे; परंतु त्याच्या कर्माची फळे त्यांना भोगावी लागतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार प्रवीण दरेकर आदीसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.