रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेनेचा एल्गार, ‘खड्डे खोदो’ आंदोलन करून प्रशासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:09 AM2017-12-09T02:09:02+5:302017-12-09T02:09:16+5:30
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट येथून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे गेली तीन वर्षे खड्डेमय झालेल्या दिघी-वडवली फाटा-म्हसळा-माणगाव या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन करीत
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट येथून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे गेली तीन वर्षे खड्डेमय झालेल्या दिघी-वडवली फाटा-म्हसळा-माणगाव या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन करीत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ श्रीवर्धन शिवसेना संघटनेच्या वतीने वेळास गावाजवळील शंकर मंदिराजवळ ‘खड्डे खोदो’ आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत जर शासनाने व दिघी पोर्ट प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष दिले नाही, तर शिवसेना स्टाइलने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडून दिघी पोर्टमधून होणारी अवजड वाहतूक बंद पाडून दिघी पोर्टला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख रवि मुंढे यांनी दिला.
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे दिघी-वडवली फाटा-मेंदडी-म्हसळा-साई-माणगाव या ५७ किलोमीटरच्या रस्त्याची गेल्या तीन वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. विविध प्रकारे पाठपुरावा करूनही, तसेच विविध उपोषण होऊनही प्रशासन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दखल घेत नसल्याने शिवसनेच्यावतीने शुक्रवारी वेळास गावाजवळील शंकर मंदिराजवळ ‘खड्डे खोदो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेच्या समस्यांबाबत कोणत्याही प्रकारचे सोयर-सुतक त्यांना नाही, त्यांच्याकडे रस्त्यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा केला; पण दोन दिवसांत कामाला सुरुवात करतो, असे आश्वासन दिघी पोर्टच्या मालकाने अनेकदा दिले; परंतु रस्त्याच्या कामाची दुरुस्ती झाली नाही, उलट नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. पावसाळा संपून दोन महिने उलटले तरी दिघी ते माणगाव रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणाचेच लक्ष नाही, म्हणून शुक्रवारी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. येत्या आठ दिवसांत शासनाने व दिघी पोर्ट प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष दिले नाही, तर आंदोलनाचा इशारा रवि मुंढे यांनी दिला. यासाठी येत्या चार दिवसांत शासनाने दिघी पोर्टचे मालक कलंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावावा व रस्ते दुरुस्त करताना दर्जाचे काम करून घ्यावे, असे आवाहन केले.