- प्रवीण देसाईरायगड : हर हर महादेव... जय जिजाऊ... जय शिवराय... जय भवानी... जय शिवाजी असा अखंड जयघोष व पारंपरिक वाद्यांचा गजरात बुधवारी दुर्गराज रायगडावर ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात पार पडला. पालखी सोहळा, शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि शिवभक्तांच्या अमाप उत्साहाने गडावरील वातावरण चैतन्यदायी झाले. राज्यभरातून आलेल्या लाखो शिवभक्तांनी हा नेत्रदीपक सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.सकाळी नगारखान्यासमोर ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पावणेदहाच्या सुमारास पारंपरिक वाद्यांच्या गजरात राजसदरेवर शिवछत्रपतींची मूर्ती असलेल्या पालखीचे आगमन झाले. समितीतर्फे हेमंत साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरकाई मंदिर येथून ही पालखी आणण्यात आली. त्यापाठोपाठ शिवनेरीवरून शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे आणलेल्या शिवछत्रपतींच्या पालखीचे तसेच पाचाड येथून राजमाता जिजाऊ यांची मूर्ती असलेल्या पालखीचे आगमन झाले. त्यानंतर रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या चांदीच्या उत्सवमूर्तीस जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर मेघडंबरीतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. दिल्लीसह सुमारे १३ राज्यांतील ८० शिवभक्त मावळे उपस्थित होते. कॅबिनेटची बैठक रायगडावर घ्यावी : संभाजीराजेमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक रायगडावर घ्यावी, जेणेकरून शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या पुढाºयांना शिवछत्रपतींचा इतिहास समजेल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. रायगडाच्या पायथ्याशी ८८ एकरावर लवकरच ह्यमराठा म्युझियमह्ण उभारून त्यात शिवरायांच्या मावळ्यांना स्थान देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.शाहिरांची शिवऊर्जाया देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, असे एकापेक्षा एक सरस पोवाडे सादर करत राज्यभरातील शाहिरांनी या सोहळ्यात शिवऊर्जा निर्माण केली. शाहीर राजेंद्र कांबळे (अकलूज), सूरज जाधव (औरंगाबाद), बाळासाहेब भगत यांच्यासह कोल्हापूरचे आझाद नाईकवडी यांनी पोवाडे सादर केले. तसेच कोल्हापूरचे रंगराव पाटील, दिलीप सावंत हे उपस्थित होते.
रायगडमध्ये शिवभक्तीचा महापूर; शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 5:32 AM