लोकमत न्यूज नेटवर्क पोलादपूर : तालुक्यातील ऐतिहासिक कोंढवी किल्ल्यावर भैरवनाथ, जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धार समयी खोदकाम करताना शिवकाळातील १५ मूर्ती सापडल्या आहेत. तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी येथे मंदिराचे काम करताना पाण्याची टाकी बांधण्यासाठी शिवकाळातील १५ मूर्ती सापडल्या. या मूर्तीमध्ये भैरी, जोगेश्वरी, वाघजाई, वीर मूर्ती तसेच गणेश मूर्ती इत्यादी मूर्तींचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात मूर्ती सापडल्यामुळे पोलादपूर तालुक्यासह कोकणातील भाविकांची या कोंढवी गडाकडे दर्शनासाठी रीघ लागली आहे.तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवीसह चोळई, गाजवणे, खडकवणे, धामणदेवी, फणसकोंड, गोलदरा, तळ्याचीवाडी या गावांचे आराध्यदैवत जोगेश्वरी मंदिराच्या पूर्व बाजूस पाण्याच्या साठवण टाकीसाठी खोदकाम करीत असताना या मूर्ती आढळल्या. या मूर्ती मध्ययुगीन व शिवकाळातील आहेत. या मूर्तींमध्ये श्री गणेश, भैरी, जोगेश्वरी, वाघजाई वीर इत्यादींचा समावेश आहे.कोकण इतिहास परिषदेचे प्रा. अंजय धनावडे तसेच इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी या मूर्तींसंदर्भात त्या चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या असल्याचे नमूद केले आहे. या मूर्तीअगोदरसुद्धा येथे शिवलिंगाखालील पीठ, दिवा तसेच मध्ययुगीन भांड्यांचे अवशेष सापडले.
श्री भैरवनाथ जोगेश्वरी प्राचीन मंदिर n कोंढवी हे आदिलशाही काळापासून एक प्रमुख परगणा म्हणून महत्त्वाचे ठिकाण प्रसिद्ध आहे. शिवकाळात या कोंढवी गडाचे फार महत्त्व होते. कोकण व घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रमुख मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. श्री भैरवनाथ जोगेश्वरी हे मंदिर प्राचीन काळापासून कोंढवी येथे अस्तित्वातआहे.n येथे मुंबई, पुणे, बडोदे या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात पर्यटक व शिवभक्त भेटी देतात. मात्र, येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे भक्तांची गैरसोय होते. तरी या स्थळास शासनाने पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, व येथे यात्रा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे आठगाव भैरी देवस्थानचे अध्यक्ष श्री भाई एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.