किल्ले रायगडावर रंगणार शिवराज्याभिषेक दिन, बंदोबस्तासह शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 10:51 AM2024-06-04T10:51:04+5:302024-06-04T10:51:19+5:30
दोन हजार पोलिस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात राहणार आहेत. ७०० शासकीय कर्मचारी आणि १२० स्वयंसेवकही या ठिकाणी काम करणार आहेत.
महाड : येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर ३५१ वा श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याकरिता देशभरातून लाखो शिवभक्त दाखल होणार आहेत. त्यांच्या सोयी-सुविधांसाठी रायगडावर जिल्हा प्रशासनामार्फत तयारी केली आहे.
यावेळी दोन हजार पोलिस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात राहणार आहेत. ७०० शासकीय कर्मचारी आणि १२० स्वयंसेवकही या ठिकाणी काम करणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह अन्य दोन पोलिस उपाधीक्षक, ११ पोलिस उपविभागीय अधिकारी, २८ पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक, १४० पोलिस उपजिल्हाध्यक्ष, ९०० पोलिस कर्मचारी १३५ वाहतूक पोलिस तसेच पोलिस दलाची विविध पथके या ठिकाणी दाखल होणार आहेत.
पिण्याच्या पाण्याची सुविधा
किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याकरिता गडावरील विविध ठिकाणी असलेल्या तलावातील पाणी एकत्रित केले आहे. त्याचप्रमाणे गडावर पिण्याच्या पाण्याची असुविधा होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे टँकरचेदेखील नियोजन करण्यात आले आहे.
कोंझर, पाचाड येथे पार्किंग सोय
वाहनांची पार्किंग करण्यासाठी प्रशासनाकडून कोंझर आणि पाचाड येथे सुविधा केलेली आहे. या ठिकाणी शिवभक्तांनी आपली वाहने पार्क करून तेथून एसटीने रायगडकडे सोडण्यात येणार आहे. महाड एसटी आगाराकडून याकरिता एसटी बस मागविण्यात आलेल्या आहेत.
रोपवे दिवस-रात्र सुरू राहणार
आरोग्य विभागाची पथकेदेखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा येथून पायी चालत जाणाऱ्या शिवभक्तांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या सुविधेसाठी गडावर आणि पायरी मार्गावर वैद्यकीय पथके आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. रायगड रोपवेदेखील शिवभक्तांकरिता दिवस-रात्र सुरू राहणार आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.