रायगडावर दिमाखात रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 03:12 AM2023-05-31T03:12:55+5:302023-05-31T03:13:26+5:30
पोलिसांचा चोख बंदोबस्त, पार्किंगची सुविधाही मिळणार
अलिबाग : किल्ले रायगडावर १ ते ७ जून रोजी तिथी आणि तारखेनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. गडावर शिवभक्तांची होणारी गर्दी पाहता कोणतीही गैरसोय होणार नाही. पाण्याच्या योग्य नियोजनासह, आरोग्य व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे. पाेलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, पार्किंगची कुठेही गैरसोय होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हेही उपस्थित होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमही प्रशासनातर्फे आयोजित केले जातील, असे डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.
गडावर १० लाख लिटर, पाचाड येथे ५० लाख लिटर पाण्याची व्यवस्था केली आहे. १०९ सीसीटीव्ही, एलईडी सुविधा, ३०० शौचालय आणि १०० स्नानगृह सुविधा आहे. २४ मेडिकल सेंटर प्रत्येक ३०० मीटरवर एक आरोग्य सेंटर देण्यात आले आहे. डॉक्टर, परिचारिका, औषध तसेच स्ट्रेचर, व्हीलचेअर सुविधा ही करण्यात आली आहे. दरम्यान, १७० पोलिस अधिकारी, १२०० पोलिस कर्मचारी, ३५० होमगार्ड, १ एसआरपी प्लाटून तैनात असणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १६ टन पेक्षा अधिक अवजड वाहनांना महामार्गावर बंदी घालण्यात आलेली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी ते पळस्पे, वाकण फाटा ते खोपोली व इतर राज्य मार्गांवरून होणारी वाळू, रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांना बंदी आहे. ३१ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ०२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तसेच ०४ जू रोजी १२ वाजल्यापासून ते ०६ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ही बंदी असेल.
शिवराज्याभिषेक सोहळा घरी बसूनही शिवभक्त, नागरिक पाहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवभक्तांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन आहे.
-डॉ. योगेश म्हसे,
जिल्हाधिकारी, रायगड