शिवरायांच्या 'हिंदवी स्वराज्याचा संकल्प', तेलंगणातील आमदार 'राजासिंग' शिवनेरी गडावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 08:27 PM2019-02-02T20:27:23+5:302019-02-02T20:48:27+5:30
श्रीराम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपा आमदार ठाकूर राजासिंग हे यंदाच्या निवडणुकीत निवडून आलेले भाजपाचे एकमेव आमदार आहेत.
पुणे - तेलंगणातील भाजपाचे एकमेव आमदार असलेल्या टी राजासिंग यांनी आज शिवनेरी गडावर जाऊन छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले. शूरवीर राजे शिवछत्रपती आणि माता जिजाऊंचे दर्शन घेण्याचं सौभाग्य मला लाभल्याचं राजासिंग यांनी म्हटलं. रविवारी औरंगाबाद येथे राजासिंग यांची सभा होणार आहे. धर्म जागृती सभेला संबोधित करण्यासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत.
श्रीराम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपा आमदार ठाकूर राजासिंग हे यंदाच्या निवडणुकीत निवडून आलेले भाजपाचे एकमेव आमदार आहेत. आमदारकिची निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमच ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येताच सर्वप्रथम त्यांनी शिवनेरी गडावर जाऊन छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा संकल्प घेऊया, असे राजासिंग यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटले आहे. दरम्यान, रविवारी औरंगाबाद येथे राजासिंग यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी औवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची सभा झाली होती. त्यामुळे, राजासिंग या औवेसींबद्दल काय बोलणार, याची उत्सुकता तेथील कार्यकर्त्यांना लागली आहे.
हैदराबादेतील एक कट्टर हिंदू नेता अशी राजासिंग यांची ओळख आहे. श्रीराम युवासेनेचे अध्यक्ष म्हणून राजासिंग हैदराबादमध्ये हिंदूंचे काम करतात. श्रीराम नवमीला हैदराबादमध्ये राजा यांच्याकडून दरवर्षी जंगी मिरवणूक काढण्यात येते. धुलपेठ ते कोटी भागात निघणाऱ्या या मिरवणुकीत अंदाजे 20 लाख लोक सहभागी होतात. त्यामुळे योगी आदित्यनाथ आणि साक्षी महाराज यांप्रमाणेच हिंदू धर्म रक्षणकर्ता म्हणून टायगर राजा यांनाही गणले जाते. राजासिंग हे आरएसएसचे सदस्य असून हिंदू वाहिनी आणि देशातील इतरही हिंदू संघटनांचे ते अनुयायी आहेत. तसेच हैदराबादेतील औवेसी बंधुंना उघडपणे विरोध दर्शवणारा नेता अशीही त्यांची ओळख आहे.
आज महाराष्ट्र की वीर भूमि पर जन्मे छत्रपति शिवाजी महाराज के जन्मस्थान शिवनेरी किले के दर्शन करने का सौभाग्य प्राप्त हुआ और साथ ही यहा माता के भी दर्शन किए।
— Raja Singh (@TigerRajaSingh) February 2, 2019
कल 3 Feb को शाम 5.30 बजे महाराष्ट्र के संभाजीनगर में एक विशाल धर्म जागृति सभा का आयोजन किया गया है जिसमे मैं उपस्थित रहूंगा। pic.twitter.com/liXXztQCmi