महिला शिवभक्तांनी आणली शिवज्योत; किल्ले रायगड ते बिरवाडी दौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:04 PM2020-03-13T23:04:40+5:302020-03-13T23:04:53+5:30
अनेक ठिकाणी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक
बिरवाडी : किल्ले रायगड ते महाड तालुक्यातील बिरवाडी हे ३५ किलोमीटरचे अंतर महिला शिवभक्तांनी शिवज्योत हातामध्ये घेऊन गुरुवारी पार केले आहे. महाड तालुक्यातील नवजीवन मित्रमंडळ टाकी कोंड बिरवाडी यांच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या औचित्याने दरवर्षी तरुण शिवज्योत घेऊन येतात. मात्र यंदा महिला शिवभक्तांनी सहभाग घेऊन शिवज्योत आणली. या वेळी शिवभक्त शीतल कदम /गोगावले, रेश्मा कदम, नीलम साळवी, अमृता तार, सीमा जाधव, सायली शिंदे यांनी शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवज्योत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला.
वडवली येथे रक्तदान शिबिर
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. वडवली गावातील सहकार्य सामाजिक संस्था व वडवली आगरी युवा संघटना, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ६३ जणांनी रक्तदान केले. अलिबाग येथील रायगड जिल्हा शासकीय रक्तपेढी यांनी रक्त संकलित केले. येथील डॉ. दीपक गोसावी आणि सहकारी यांच्या मदतीने रक्त संकलन करण्यात आले.
इतिहासकालीन शस्त्रसाहित्याचे प्रदर्शन
रेवदंडा : मुरूड-जंजिरा तालुक्यातील साळावमधील शिवमर्दानी आखाड्यात शिवजयंतीच्या औचित्याने इतिहासकालीन शस्त्र साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनाला मुरूड पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत मोहिते, शिवसेना संपर्कप्रमुख भगिरथ पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला शिवप्रतिमेला उपस्थितांनी पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत व प्रदर्शन भरवण्याच्या हेतूबाबत प्रास्ताविक आखाड्याचे संस्थापक किशोर चवरकर यांनी केले. आखाड्याच्या अध्यक्षा सुरेखा चवरकर, प्रशिक्षक शुभम चवरकर, आखाड्याचे मावळे उपस्थित होते.
‘दिघी नाक्याचे नामकरण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक करा’
म्हसळा : दिघी नाकाचे नामकरण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक करा, अशी मागणी गुरुवारी शिवप्रेमींकडून करण्यात आली. शिवजयंती गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तसेच शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सवात रायगडावरून शिवज्योत, पालखी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ तसेच साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.