म्हसळा : सध्या देशात कोरोना कोविड-१९ या जैविक युद्धात अनेक मजुरांवर तसेच गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना पुरेसे अन्न मिळेनासे झाले आहे. यातच काही स्वयंसेवी संस्था पुढाकार घेताना दिसत आहेत, परंतु लॉकडाउन वाढत असून यामध्ये हातावर पोट असलेल्या नागरिकांची मात्र बिकट अवस्था झाली आहे. सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचा चांगला लाभ अशा गरजूंना होत आहे. यामध्ये प्रत्येकी पाच रुपयेप्रमाणे मिळणाऱ्या थाळीला योग्य प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेऊन खामगावमध्येदेखील शिवभोजन थाळीचा शुभारंभ म्हसळा तालुका तहसीलदार शरद गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी मंडळ अधिकारी एस.के. शहा, नंदकुमार शिर्के आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सर्वत्र ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, ज्यांना अन्नधान्याची आवश्यकता आहे त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात संपर्क साधावा. प्रथम आपल्या नावाची नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा केले आहे. कोणीच उपाशी राहणार नाही याबाबतची दक्षता घेतली जात आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांमार्फत यासाठी पुढाकार घेतला जात आहे. जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये शिवभोजन योजनेला सुरुवात करण्यात आली आहे.२४०० शिवभोजन थाळी विक्री केली जात आहे. स्वयंसेवी संस्थांमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने बेघर झालेल्या लोकांनादेखील यामधून मदत केली जात आहे. ताम्हाणे शिर्के येथील पूर्वा महिला बचतगट यांच्या नावे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. एका दिवसात जवळजवळ शंभर गरजूंनी याचा लाभ घेतला.मोहोपाड्यात शिवभोजन थाळी उपक्रम सुरूमोहोपाडा : लॉकडाउन काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून मोहोपाडा वीज मंडळाच्या कार्यांलयासमोर शिवभोजन थाळीचा शुभारंभ गुरुवार २३ रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आला. या वेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी फीत कापून शिवभोजन थाळीच्या उपक्रमास सुरुवात केली. या थाळीत दोन चपात्या, पुरेसा भात, वरण व भाजी आदी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गरजू व गोरगरिबांना मोफत वाटप करण्यात आले. तसेच चौक येथेही गुरु वारपासून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. मोहोपाड्यात शिवभोजन थाळी शनिवार २५ पर्यंत सर्व गरजू गोरगरिबांना मोफत देऊन रविवारपासून शिवभोजन थाळी नागरिकांना पाच रुपयांत मिळणार असल्याचे संतोष पांगत यांनी सांगितले.
खामगावमध्ये शिवभोजन थाळी सुरू; गोरगरिबांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 1:04 AM