शिवगर्जनेने दुमदुमला रायगड; शिवभक्तांसह चार देशांच्या राजदूतांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:59 AM2019-06-07T03:59:58+5:302019-06-07T04:00:15+5:30
किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती.
दासगाव/ महाड : रिमझिम पाऊस, मधूनच उठणारे धुके अशा आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावर गुरुवारी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगडावर गर्दी केली होती. या वेळी शिवभक्तांच्या शिवगर्जनेने रायगड दुमदुमून गेला.
किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. पायरी मार्ग, रायगड रोपवे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. पहाटेच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. गडावर वाजणारे ढोल-ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला. शाहिरांच्या या पोवाड्यांना उपस्थित शिवभक्तांनी देखील उठून दाद दिली. या वेळी छ.शिवाजी महाराज यांची पालखी वाजतगाजत राजसदर येथे आणण्यात आली. राजसदरेवर छत्रपती युवराज संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. विशेष म्हणजे या सोहळ्याला चीनचे राजदूत लुई बिन, बल्गेरियाचे राजदूत एली बेरा, पोलंडचे दमयीन हेरोली, ट्युनेशिया या चार देशांचे राजदूत यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, राष्ट्रसेवा समूह या संस्थेचे अध्यक्ष राहुल पोकळे, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते. सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा संकल्पनेखाली काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत अठरापगड जाती धमार्तील लोक सहभागी झाले होते. त्यात राजसदरेवर शेतकरी कुटुंबाला यंदा मान मिळाला. यावेळी मेडसिंगा (जि. उस्मानाबाद) येथील गणपती नामदेव आवचार, चिवाबाई आवचार, रेश्मा आवचार या शेतकरी कुटुंबाला संभाजीराजे यांच्या हस्ते एक लाख रुपयांची मदत देण्यात आली.
चीनच्या राजदूतांनी केला छत्रपतींचा गौरव
चीनचे राजदूत लियू बिंग म्हणाले, चीन व भारताच्या संस्कृती जुन्या असून, छत्रपती शिवराय हे नॅशनल हिरो आहेत. भारत व चीनमध्ये राष्ट्रपुरुषांविषयी आदराची सामायिक भावना आहे.
राज्यातील गड-किल्ल्यांकडे दुर्लक्ष - संभाजीराजे
एकीकडे देशात विविध प्रकल्पांसाठी पैसे उभे केले जात असताना महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे अशी खंत व्यक्त करून याकरिता स्वतंत्र मंत्रालय असावे, असे प्रतिपादन संभाजीराजे यांनी व्यक्त केले. एकीकडे शासनाला बुलेट ट्रेनसारख्या उपक्रमांना पैसे उभे करता येतात मग गड-किल्ल्यांसाठी का करता येत नाहीत, असा प्रश्न त्यांनी केला. किल्ले रायगडावरील १२०० एकर जागेत ८४ छोटे-मोठे तलाव असून यापैकी २२ तलावामधील गाळ काढण्यात आला आहे.
गंगासागर व हत्ती तलावातील गाळ काढण्यात आला असून येत्या दोन वर्षात हे सर्व तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असतील. गडावरील शुद्ध पाण्याचा पुरवठा २१ गावांना करण्याची योजना केली जाईल, असे संभाजीराजांनी सांगितले. तसेच राज्यातील दुष्काळ दूर करण्यास गेली अनेक वर्षांत उपाययोजना झालेल्या नाहीत. याठिकाणी संत्री, द्राक्ष आदी फळ पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असले तरी ते आयात करावे लागते. हे दुर्दैव असून यापुढे शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.