जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड शिवकर ग्रामपंचायत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:47 PM2020-09-27T23:47:28+5:302020-09-27T23:47:45+5:30
स्मार्ट ग्राम योजना : रायगड जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड
वैभव गायकर।
पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित केल्या गेलेल्या स्मार्ट ग्राम योजना २०१८-२०१९ मध्ये पनवेलमधील शिवकर ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रखम क्रमांक पटकाविला आहे. रायगड जिल्ह्यामधील १५ तालुक्यांतील ८०९ ग्रामपंचायतीमधून शिवकर ग्रामपंचायतीची निवड झाली असून, ५० लाखांचे पारितोषिक शिवकर ग्रामपंचायतीला मिळणार आहे.
या योजनेंतर्गत स्वच्छता, दायित्व, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शक व तंत्रज्ञान आदी निकषांमध्ये शिवकर ग्रामपंचायतीने १०० पैकी ९४ गुण मिळवले. दुसरा क्रमांक रोहा तालुक्यातील धोंडखार तर तिसरा क्रमांक उरणमधील चिरनेर या ग्रामपंचायतीला मिळाला आहे. तालुक्यात अव्वल आल्याने या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. १८ सप्टेंबर रोजी अलिबागच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जिल्हास्तरीय समितीने रायगड जिल्ह्यातील १५ गटांतील तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या ग्रामपंचायतींच्या गुणांची पडताळणी केली होती. सध्या शिवकर ग्रामपंचायतीची लोकसंख्या २,४३४ असून, एकूण क्षेत्रफळ २६१ हेक्टर आहे. यापैकी १६८ हेक्टर जागेवर शेती केली जाते. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केली जाते. याकरिता निम्मा खर्च ग्रामपंचायत उचलते. संपूर्ण नैसर्गिकरीत्या भातशेती करणाºया शेतकºयाकडून ग्रामपंचायत शासनाच्या जादा दराने भात खरेदी करते. सरपंच अनिल ढवळे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीद्वारे डिजिटल दवंडी, शोष खड्ड्याद्वारे सांडपाण्याचा निचरा, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही, ग्रामपंचायतीचा कारभार आॅनलाइन, महिला सक्षमीकरणासाठीचे उपक्रम आदींसह विविध उपक्रम राबविले गेले आहेत. लवकरच हा पारितोषिक समारंभ पार पडणार आहे. जिल्ह्यात स्मार्ट ग्रामपंचायत योजनेत प्रथम क्रमांक पटकाविल्याने शिवकरचे सरपंच अनिल ढवले यांनी आनंद व्यक्त केला.
ग्रामपंचायती स्वच्छता दायित्व व्यवस्थापन अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण पारदर्शक व तंत्रज्ञान मिळालेले गुण
१) शिवकर २० १६ २३ २० १५ ९४
२) धोंडखार १९ १९ २० १९ १५ ९१
३) चिरनेर २० ११ २२ २० १५ ८८
शिवकर ग्रामपंचायतीला राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचविण्याचा संपूर्ण गावाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.