पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीची डिजिटलायझेशनकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:16 PM2019-06-01T23:16:24+5:302019-06-01T23:16:58+5:30
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही : वेळेवर कर भरणाऱ्यांना विशेष सवलत
वैभव गायकर
पनवेल : पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने रहिवाशांच्या सुरक्षेसाठी व सक्षमीकरणासाठी नवीन पॅटर्न तयार केला असून, गावाची डिजिटलाईज वाटचाल सुरू आहे.
शिवकर ग्रामपंचायतीने डिजिटलायझेशनच्या दृष्टीने लोकसहभागातून अनेक गोष्टी उभारण्यात आलेल्या आहेत. गावात सुरक्षेच्या दृष्टीने १६ सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त प्रोजेक्टर, साउंड सिस्टीम, रस्त्याच्या दुतर्फा पामची झाडे आदी लावण्यात आली आहेत.
सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च करण्यात आले असून मुख्य रस्ते, शाळा, वर्दळीच्या ठिकाणी ते लावण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच अनिल ढवळे यांनी दिली. घरपट्टी तसेच पाणीपट्टी वेळेवर भरणाºया ग्रामस्थांना मोफत धान्य दळून देण्याची योजना ग्रामपंचायतीने अमलात आणली आहे, याकरिता गावातील तीन राईस मील सोबत ग्रामपंचायतीने बोलणी केली आहे. ग्रामस्थांनी कर वेळेवर भरल्यास ग्रामपंचायतीला विविध देयके देण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत नाहीत, अथवा व्याजापोटी इतर खर्च वाढू नये, हा या मागचा उद्देश आहे.
सध्याच्या घडीला गावची लोकसंख्या २४३४ असून, एकूण क्षेत्रफळ २६१ हेक्टर आहे. यापैकी १६८ हेक्टर जागेवर शेती केली जाते. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केली जाते. याकरिता निम्मा खर्च ग्रामपंचायत उचलते. संपूर्ण नैसर्गिकरीत्या भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून ग्रामपंचात शासनाच्या जादा दराने भात खरेदी करते. सध्याच्या घडीला प्रतिक्विंटल १७५० रुपये शासन शेतकऱ्याला भाव देते. ग्रामपंचायत प्रतिक्विंटल २००० रुपयाचा भाव देते. सेंद्रिय शेतीद्वारे पिकवलेले धान्य ग्रामपंचायत प्रदर्शन भरवून २००० अधिक ५०० रुपये आकारून विक्री करेल, अशी योजना ग्रामपंचायत सरपंच अनिल ढवळे यांनी आखली आहे.
डिजिटल दवंडी
ग्रामपंचायत क्षेत्रात कोणतीही सूचना द्यावयाची दवंडी पिटली जाते. याचा अर्थ ग्रामपंचायतीने नेमलेला कर्मचारी गावात जाऊन प्रत्येक चौकात ओरडून सर्वांना माहिती देतात. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात ग्रामपंचायतीने गावातील महत्त्वाच्या चौकात कायमस्वरूपी स्पीकर लावले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयातून दिलेल्या सूचना थेट ग्रामस्थांना ऐकायला येतात. विशेष म्हणजे, ग्रामसभादेखील अशाचप्रकारे लाइव्ह ग्रामस्थांना ऐकायला मिळतात.
शोषखड्ड्याद्वारे सांडपाण्याचा निचरा
शहरामध्ये देखील सांडपाण्याचे नियोजनाचे तीन-तेरा उडाले असताना, शिवकर गावात सुमारे २०० शोषखडे खोदण्यात आलेले आहेत. या खड्ड्यामध्ये गावातील सांडपाणी जिरविले जाते.
उद्दिष्ट नंबर एकचे
ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असून डिजिटलायझेशनच्या माध्यमातून काम करणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. मात्र, राज्यातही आदर्श ग्रामपंचायत बनण्याचा मान मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच अनिल ढवळे यांनी सांगितले.