पेब किल्ल्यावर थर्टी फर्स्टची पार्टी करणाऱ्या झिंगाट मद्यपींना शिवप्रेमींचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:19 AM2020-01-02T10:19:35+5:302020-01-02T10:20:30+5:30
काही मद्यप्रेमींनी पेब किल्ल्याची ऐतिहासिक आणि धार्मिक मर्यादा पायदळी तुडवत मद्यपान आणि नशाखोरी करत आगावूपणा केला.
नेरळ/रायगड - 2019 ला निरोप देऊन नववर्ष 2020 चे संपूर्ण जगभरात उत्साहात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेहमी संधीच्या शोधात असलेले मद्यपी आणि अन्य व्यसनी मंडळींनी थर्टी फर्स्टच्या निमित्ताने आपला घसा ओला करून घेतला. मात्र काही मद्यप्रेमींनी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या मर्यादा पायदळी तुडवत अशा ठिकाणी मद्यपान आणि नशाखोरी करत आगावूपणा केला. दरम्यान, नेरळजवळील पेब (विकटगड) किल्ल्यावर मद्यपान आणि नशाखोरी करणाऱ्या काही पर्यटकांना शिवप्रेमींनी दणका दिला आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही मुंबईतील काही हौशी मंडळींनी माथेरानजवळील पेब किल्ला गाठला होता. त्यांनी दारू आणि गांजासह नशेचे अन्य पदार्थ सोबत घेत पार्टीची जोरदार तयारी केली होती. मात्र त्यांची पार्टी ऐन रंगात आली असतानाच शिवप्रेमींनी त्यांना पकडले आणि या झिंगाट मंडळींची नशा उतरवली.
त्यानंतर या मद्यप्रेमींना अर्धनग्न करत त्यांच्याकडून चूक कबूल करवून घेतली. तसेच शिवप्रेमींनी त्यांना केल्या प्रकाराबाबत माफी मागण्यास लावली. या सर्वप्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.