महाड : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 6 डिसेंबर रोजी रायगडावर येत आहेत. राष्ट्रपती कोविंद हे हेलिकॉप्टरने येणार आहेत. मात्र हेलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरण्यास शिवप्रेमींनी विरोध केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
रायगड किल्ल्यावरील होळीच्या माळावर हेलिपॅड उभारण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. राष्ट्रपती यांचे हेलिकॉप्टर रायगडावर उतरुन देऊ नका, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी या ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आले होते. परंतू हेलिकॉप्टर उतरताना प्रंचड माती आणि धूळ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर उडत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर शिवप्रेमींनी या विरोधात आंदोलन केले होते.
1996 साली या ठिकाणचे हेलिपॅड काढून टाकण्यात आले होते. सुमारे २० वर्षांच्या कालावधीत कोणालाही या ठिकाणी हेलिकॉप्टरने येण्यास परवानगी देण्यात आली नाही. येत्या 6 डिसेंबरला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगडवर येत आहेत. यानिमित्त होळीच्या माळावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी हेलिपॅड उभारण्यात येत आहे. याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे.
महाडमधील शिवप्रेमी सिद्देश पाटेकर यांनी सांगितले की राष्ट्रपतींच्या या दौऱ्याला आमचा विरोध नाही. मात्र या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवताना आणि उड्डाण घेताना धूळ, माती महाराजांच्या पुतळ्यावर उडणार आहे. त्यामुळे तो एकप्रकारे महाराजांचा अवमान करण्यासारखेच आहे. त्यामुळे आमचा या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यास आणि हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध आहे.