महाड : सोमवारी हजारो शिवभक्तांच्या साक्षीने किल्ले रायगडावरील राजदरबारामधे ३४४ वा श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळा मुसळधार पावसाच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी राज्यातील सप्त नद्यांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीवर करण्यात आला.रायगड जिल्हा परिषद श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव उत्सव समिती व विविध शिवभक्त संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागताध्यक्ष आ. भरत गोगावले होते. यावेळी जि. प. सदस्य मनोज काळीजकर, मैथिली खेडेकर, सुरेश पवार, प्रशांत ठोसर शिवराज्याभिषेक दिन समितीचे विविध पदाधिकारी स्थानिक शिवभक्त महाड, पोलादपूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड व कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त वर्षांपासून किल्ले रायगडावर तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहाटे ५ वाजता राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी ६च्या सुमारास ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने पालखीने राजदरबारात प्रवेश केला. सकाळी श्री पंचाक्षर माहेश्वर जंगम पौरोहित्य मंडळाने शंभर सहकाऱ्यांच्या मदतीने वेद मंत्रोच्चारात राज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात केली. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती व सहयोगी शिवभक्त संघटनांच्या वतीने शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यावर सुवर्णमुद्र्रांचा अभिषेक करण्यात आला. महाड व इतर परिसरातील ढोल-ताशे पथकांनी रविवारपासूनच रायगडावर हजेरी लावली होती. सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यासह ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरीतून हजारो शिवभक्तांची उपस्थिती होती.
रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:53 AM