महाड : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड या संस्थेतर्फे ६ जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती या समितीच्या वतीने मंगळवारी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
समितीचे सदस्य रघुवीर देशमुख, प्रशांत दरेकर आणि वैभव शेडगे यांनी ही पत्रकार परिषद घेतली. तारखेप्रमाणे ६ जून रोजी येणारा शिवराज्याभिषेक दिन हा लोकोत्सव व्हावा, यासाठी समितीच्या माध्यमातून शिवभक्तांनी या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे या सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या संख्येत वर्षागणिक वाढ होत आहे. यावर्षीदेखील अलोट जनसागर या सोहळ्यासाठी लोटणार असून, त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यंत काळजीपूर्वक या सोहळ्याचे नियोजन करण्यात आल्याचे सदस्यांनी सांगितले.
५ जूनपासूनच शिवभक्त रायगडवर येणार आहेत. खा. छ. संभाजी राजे आणि युवराज शहाजीराजे हे असंख्य शिवभक्तांसह ५ जून रोजीच पायऱ्यांनी रायगडवर जाणार आहेत. ५ जूनच्या सायंकाळपासूनच गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जून रोजी राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा, शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम होणार आहेत. कडाक्याचे ऊन असल्याने शिवभक्तांसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा गडावर आणि गडाच्या पायथ्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेळेस गड आणि गडपरिसरात गतवर्षीपेक्षा अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सुमारे ५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे एक हजार स्वयंसेवकही तैनात करण्यात आले आहेत.
गड चढताना आणि उतरताना कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ होऊ नये, यासाठी आयोजक आणि स्वयंसेवकांकडून केल्या जाणाºया सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात राहणार चोख पोलीस बंदोबस्त५ जून ते ६ जून असे दोन दिवस अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छावा संघटना यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४६ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यासाठी रायगड जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. शिवराज्याभिषेकासाठी राज्यातून बहुसंख्य शिवभक्त उपस्थित राहत असल्याने कोणताही कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ पोलीस निरीक्षक, २७ सह. पोलीस निरीक्षक / उपनिरीक्षक, ५०० पोलीस कर्मचारी, २९० गृहरक्षक दलाचे जवान, तसेच आरसीपीची एकआणि एसआरपीएफची एक तुकडी, तसेच गोपनीय कर्मचारी असा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.