अलिबाग : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या सुमुहूर्तावर शिवराय छत्रपती झाले आणि रयतेचे राजे झाले. ही तिथी पुसण्याचा प्रयत्न ज्यांनी कोणी चालवला आहे त्यांना शिवराय कधीच माफ करणार नाहीत. जशी आषाढी वारी, तशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्री शिवराज्याभिषेकदिन सोहळा मराठी तिथीनुसार येत्या १५ जून २०१९ रोजीच आयोजित केला जाणार असल्याचे महाडच्या कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, रायगडावर मराठी तिथीप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी श्री शिवराज्याभिषेकदिन सोहळा आयोजित करण्याच्या इतिहासाची माहिती महाडमधील शिवप्रेमी दीपक शिंदे यांनी दिली आहे. १९९५ च्याही आधीपासून किल्ले रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे श्रीशिवराज्याभिषेक दिन साजरा होत होता. सलग १४ वर्षे हा उत्सव राजू पराडकर या डोंबिवलीच्या तरुणाने दहा ते पंधरा जणांना सोबत घेऊन सुरू केला होता. २००७ पर्यंत या उत्सवाला दहा ते बारा हजार शिवभक्तांची उपस्थिती लाभत होती. जाणत्या राजांचा हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी केवळ मावळ्यांचीच उपस्थिती असलेला हा उत्सव फक्त आणि फक्त मावळ्यांचाच होता, असे शिंदे यांनी सांगितले.
श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव दिवसेंदिवस मोठा होत होता. शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश जाधव, कोल्हापूरचे इंद्रजीत सावंत हे तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळ्याला कितीतरी वर्षे येत होते. त्यांच्या समवेत कोल्हापूरचे अनेक मावळेही येत होते. पण २००७ मध्ये या उत्सवाला कोल्हापूर गादीचे संभाजीराजे छत्रपती यांना प्रमुख पाहुणे म्हणून आणण्याचा प्रस्ताव गिरीश जाधव व सावंत यांनी मांडल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
शिवराज्याभिषेकाच्या मुख्य पूजेचा मान खुद्द सुरेश पवार या दाम्पत्याचा होता. कोकण कडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार व त्यांच्या पत्नी पाटावर बसताच समोर खुद्द संभाजी राजे छत्रपती हजर झाले. शिवभक्त सुरेश पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता तो मान संभाजीराजे छत्रपतींना दिला. किमान दोन वर्षे संभाजीराजे छत्रपती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी याच तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर येत होेते,असे त्यांनी पुढे सांगितले. दोन वर्षांनंतर संभाजीराजे यांच्या जवळच्या माणसांनी संभाजीराजे यांना कोणता कानमंत्र दिला काही कळला नाही. पण पुणे येथे सभा घेऊन हाच उत्सव ६ जून या इंग्रजी तारखेप्रमाणे घेण्याचे आवाहन संभाजी राजांनी केले.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेकबऱ्याच संस्थांनी आणि शिवभक्तांनी तिथीप्रमाणेच हा उत्सव होईल असा ठाम निर्धार संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर मांडला. परंतु या विरोधाला न जुमानता अशा प्रकारे ६ जून या नवीन राज्याभिषेकाला सुरु वात झाली. आजही रायगडावर तिथीनुसार राज्याभिषेक कर्मवंत मराठ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. यावर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे १५ जून २०१९ रोजी येत आहे. मोठ्या प्रमाणावर शिवभक्त रायगडावर गर्दी करणार आहेत असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केले.