महाडमध्ये बंडखोरांवर कारवाईच्या मागणीवर शिवसैनिक ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 04:17 AM2018-08-31T04:17:10+5:302018-08-31T04:17:52+5:30
दत्तात्रेय फळसकर यांचा सभापतीपदाचा राजीनामा
महाड : पंचायत समिती सभापती निवडणुकीत झालेल्या बंडखोरीमुळे महाड तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला संताप अद्याप शमलेला नाही. गुरुवारी महाडचे आमदार भरत गोगावले यांनी घेतलेल्या बैठकीत बंडखोरी करणाऱ्या पाचही सदस्यांचे राजीनामे घ्यावेत आणि त्यांना बंडखोरी करण्यास प्रवृत्त करणारे पडद्यामागचे सूत्रधार शोधून त्यांचीही पक्षातून हकालपट्टी करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. दरम्यान, बंडखोरी करून सभापतीपदी निवडून आलेल्या दत्तात्रेय फळसकर यांनी सभापतीपदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला आहे.
आ. गोगावले यांनी बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीला तालुका प्रमुख सुरेश महाडिक, सेनेचे पाचही जिल्हा परिषद सदस्य, चार निष्ठावंत सदस्य यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. उपजिल्हा प्रमुख बिपीन म्हामुणकर, माजी जि. प. सदस्य, ज्येष्ठ शिवसैनिक बाळ राऊळ आणि पाच बंडखोर सदस्य मात्र अनुपस्थित होते. बंडखोरी करणाºया सदस्यांचे राजीनामे घ्यावेत अशी एकमुखी मागणी शिवसैनिकांनी केली असून त्यावर एक तारखेपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन गोगावले यांनी दिले.