पोलादपूर : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी पार पडल्या.१६ ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीत शेकाप २, शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आघाडी २, शिवसेनेचे १0 जागी सरपंच ,काँग्रेस २ जागी सरपंच असून तालुक्यातील १0 ग्रामपंचायती आपल्याकडे राखत शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एखदा सिद्ध केले आहेतालुक्यातील बोरज ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत शिवसेनेचे युवा नेते अनिल मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांसह शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार पांडुरंग विष्णू सुतार हे विजयी झाले. कापडे बु. ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेने ९ पैकी सहा सदस्य निवडून आणून सरपंचपदी शिवसेनेच्या सुवर्णा जितेंद्र सकपाळ यांनी एक हाती विजय मिळवला. मोरसड ग्रामपंचायतीमध्ये आघाडीचे उमेदवार भिवा उतेकर यांनी शिवसेनेच्या चंदू सालेकर यांचा ६८ मतांनी पराभव केला. धारवली ग्रामपंचायतीमध्ये आघाडीच्या अश्विनी सातपुते या निवडून आल्या, मोरगिरी ग्रामपंचायतीवर शेकापने आपली सत्ता अबाधित राखत शरद जाधव सरपंचपदी विजयी झाले. सडवली ग्रामपंचायतीचे शेकापच्या सरपंच ताई पवार यांच्यासह सात सदस्य निवडून आले.गोवेले ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार नंदाबाई कदम यांच्या सह सर्व सदस्य निवडून आले. कोंढवी ग्रामपंचायतमध्ये सेनेचे अमोल मोरे विजयी झाले. तालुक्यातील वाडी वस्तीवरील विकास गेली अनेक वर्षे खुंटला असल्याने चरई ग्रामस्थांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तालुक्यातील झालेल्या या निवडणुकीत सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचा मतदारांनी कौल दिला आहे. सत्ता परिवर्तन, जातनिहाय होणारे मतदान,चाकरमानी आदि मुद्दे या वेळी मतदानांनी गांभीर्याने विचारात घेवून मतदान केल्याने परिवर्तन घडून आले असल्याचे मत मान्यवरांचे आहे.
पोलादपूरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:49 AM