शिवसेना, शेकापची प्रतिष्ठेची लढत
By admin | Published: February 17, 2017 02:13 AM2017-02-17T02:13:55+5:302017-02-17T02:13:55+5:30
तालुक्यातील सात मतदार संघातून सर्वाधिक सात उमेदवार निवडून जाणार असल्याने शेकापसह शिवसेना-काँग्रेस आघाडीने
अलिबाग : तालुक्यातील सात मतदार संघातून सर्वाधिक सात उमेदवार निवडून जाणार असल्याने शेकापसह शिवसेना-काँग्रेस आघाडीने याकडे लक्ष केंद्रित केले आहे. मतदानाची तारीख जवळ येत आहे, तशी प्रचारात रंगत वाढत आहे. थळ मतदार संघामध्ये चुरशीची लढत होणार असल्याने शिवसेना, शेकापने येथील लढत प्रतिष्ठेची केली आहे.
अलिबाग तालुक्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा यांनी आघाडी केली आहे, तर शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले आहे. शहापूर, मापगाव, चेंढरे, बेलोशी जिल्हा परिषद मतदार संघ काँग्रेस लढवत आहे, तर चौल, थळ, कुडूर्स जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे थळ, वरसोली, कुडूर्स, आंबेपूर, चेंढरे, खंडाळे, रामराज पंचायत समिती शिवसेना, मापगाव, आवास, रेवदंडा, बेलोशी काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे शहापूर मतदासंघातील प्रत्येकी एक-एक काँग्रेस आणि शिवसेना लढत आहे. नागाव पंचायत समिती भाजपाला सोडली आहे.
शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीची एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते शेकापला मनापासून मदत करणार का? हा प्रश्न आहे. शेकापने त्यांना एकही जागा न सोडल्याने त्यांचे अस्तित्वच संपल्यासारखे आहे. त्यांच्या नाराजीचा फटका कमी-अधिक प्रमाणात शेकापच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, भाजपा एकत्र आल्याने त्यांची ताकत वाढलेली आहे.
एकमेकांच्या उमेदवारांना शह देण्यासाठी प्रचाराचे रान पेटवले आहे. मतदार संघात सभा, बैठका, रॅली, मतदारांना घरी जाऊन भेटणे अशा प्रचाराला सुरुवात झाली आहे. घराघरांत जाऊन विविध पत्रके वाटली जात आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये महत्त्वांच्या नेत्यांच्या सभा मतदार संघात लावल्या आहेत. थळ मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार मानसी दळवी या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात. त्यांच्याविरोधात शेकापने चित्रा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यामध्ये काटे की टक्कर होणार आहे. येथील लढत प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. चित्रा पाटील यांना कुडूर्स मतदार संघातूनही उमेदवारी दिली आहे. आमदार सुभाष पाटील यांच्या पत्नी सुश्रूता पाटील यांना शहापूरमधून उमेदवारी दिली आहे. (प्रतिनिधी)