पक्षविरोधी कारवाया केल्यानं सेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:43 PM2018-11-19T14:43:55+5:302018-11-19T14:50:14+5:30
पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पदांच्या नियुक्तीसंदर्भात सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन पदे वाटप केल्याचा आरोप उघडपणे केला होता.
वैभव गायकर
पनवेल - पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पदांच्या नियुक्तीसंदर्भात सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन पदे वाटप केल्याचा आरोप उघडपणे केला होता. यासंदर्भात मोबाईलवरील संभाषणाच्या क्लिप देखील व्हायरल झाल्या होत्या. या प्रकाराची पक्षाने गंभीर दखल घेतली असुन पालिका क्षेत्रातील सहा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
पनवेल जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी 18 तारखेला काढलेल्या पत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये महिला उपजिल्हासंघटक आदिती सोनार, महिला तालुका शहर संघटक प्रमिला कुरघोडे, महिला तालुका संपर्क संघटक प्रतिभा सावंत, उपमहानगर प्रमुख गुरुनाथ पाटील व एकनाथ म्हात्रे यांच्या नियुक्तीला या पत्राद्वारे स्थगिती देण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाईमुळे संबंधित नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी दिली. सेना प्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला संपर्क प्रमुख किशोरी पेडणेकर, जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता साळवी यांच्या आदेशाने संबंधित कारवाई करण्यात आली आहे.