राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या सत्तेला शिवसेनेचा 'बाण'; कर्जतच्या नगराध्यक्षपदी सुवर्णा जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:36 PM2019-01-28T12:36:04+5:302019-01-28T12:44:24+5:30
कर्जतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्ण जोशी विजयी झाल्या आहेत.
रायगड- कर्जतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्ण जोशी विजयी झाल्या आहेत. गेल्या 25 वर्षांपासून आघाडीकडे असलेली सत्ता खेचून आणत सुवर्णा जोशी 2100 मतांनी विजयी झाल्या आहेत. नगर परिषदेचे 18 सदस्य निवडीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. त्यात शिवसेनेनं 4, भाजपानं 4 आणि आरपीआयनं 1 जागा जिंकली.
तर राष्ट्रवादीनं आठ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत कर्जतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्णा जोशी विजयी झाल्या आहेत. 22 हजार 863 मतदार असलेल्या कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष आणि 18 सदस्य निवडण्यासाठी मतदान घेण्यात आले होते. 9 प्रभागांतील 31 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिनद्वारे मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली.
भिसेगाव, गुंडगे, दहिवली, मुद्रे, आकुर्ले या भागात मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे युतीचं पारडं जड झालं होतं. शहरी भाग असलेल्या बाजारपेठ परिसरात मतदारांचे प्रमाण कमी होते. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.