शिवशाही बसचा एक किलोमीटर प्रवास चक्क रिव्हर्स गियरमध्ये; ‘क्लच’ निकामी झाल्याने गोंधळ
By जमीर काझी | Published: July 20, 2022 09:04 AM2022-07-20T09:04:24+5:302022-07-20T09:05:03+5:30
चालकाचे प्रसंगावधान २४ प्रवाशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
जमीर काझी, लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस मध्य प्रदेशात नर्मदा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू असताना अलिबागला शिवशाही बसमधून निघालेल्या २४ प्रवाशांच्या जिवावरही काहीसा असाच प्रसंग उद्भवला होता. कालेखिंड घाटात बसचे क्लच बेक्र निकामी झाल्याने तब्बल एक किलोमीटर बस रिव्हर्स गिअरमध्ये मागे घेण्यात आली. अचानकपणे उद्भवलेल्या या प्रसंगामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला असताना चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या एका बाजूला सुखरूपपणे थांबवली. त्यामुळे सर्वजण सुखरूपपणे बाहेर पडले. त्यांनी अन्य बसमधून प्रवास करीत अलिबाग गाठले.
पनवेल- अलिबाग या मार्गावरील विनावाहक शिवशाही बसमध्ये ( एम.एच.०९-ईएम-९०४२) मंगळवारी पावणे बाराच्या सुमारास हा प्रसंग उद्भवला. बसचालक अनिल हळवी याने बसचे क्लच पडत नसल्याने मोठ्या धैर्याने घाटात समोरून व मागून येणाऱ्या वाहनासाठी रस्ता देत बस एक किलोमीटर मागे घेतली. सुदैवाने आज पावसाची उघडीप असल्याचाही फायदा झाला.
पनवेलच्या बस आगारातून सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवशाही बस २४ प्रवाशांना घेऊन अलिबागला निघाली. पावणे बाराच्या सुमारास ती कालेखिंड घाटाजवळ पोहोचली. वेड्यावाकड्या वळणाचा घाट चढत असताना निम्मे अंतर पूर्ण झाले असताना बसचा ‘क्लच’ निकामी झाला असल्याचे चालकाच्या लक्षात आले. तो पडत नसल्याने गाडी पुढे न जाता जागेवर थांबली.
गिअर बॉक्समधून आवाज व धूर निघू लागला. त्याचवेळी अरुंद घाटात दोन्ही बाजूंनी ये-जा सुरू होती. त्यामुळे बस त्यांना धडकण्याची किंवा रस्त्याच्या बाजूला दरीकडे जाण्याची भीती होती. सुरुवातीला ट्रॅफिक जाममुळे बस थांबली असेल, असा प्रवाशांचा समज होता. मात्र, काही वेळातच खरा प्रकार लक्षात येताच त्यांच्यात घबराट निर्माण होऊन काहीसा गोंधळ उडाला. मात्र, चालक अनिल हळवीने प्रसंगावधान दाखवित बस मागे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
गाडीतील दोघांना खाली उतरवून मागील वाहनांना बाजूच्या दिशेने जाण्याची सूचना करण्यास सांगितले आणि बस ‘रिव्हर्स गिअर’मध्ये मागे घेण्यास सुरुवात केली. यामुळे कुठेही गोंधळ उडाला नाही.