पाचाड येथे रायगड महोत्सवात अवतरणार शिवशाही
By admin | Published: January 21, 2016 03:56 AM2016-01-21T03:56:05+5:302016-01-21T03:56:05+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे २१ ते २४ जानेवारी या कालावधीत रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे रायगड महोत्सवाचे
महाड : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे २१ ते २४ जानेवारी या कालावधीत रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे गुरु वारी सकाळी ११वा. किल्लेरायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत.
रायगड महोत्सवात ५० हजारांहून अधिक शिवभक्त हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त केला जात असून स्थानिक प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झालेली आहे अशी माहिती प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. महोत्सवाला येणाऱ्या पर्यटकांच्या वाहने पाचाडपासून तीन किमी अंतर अगोदर थांबवण्यात येणार असून तेथून महोत्सवाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी प्रशासनातर्फे पाच बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर मागील विविध कार्यक्रमांच्यावेळी वाहने या मार्गावर वाहतुकीची झालेल्या कोंडीमुळे पर्यटकांचे मोठ्याप्रमाणावर हाल झाले होते. ही वाहतूक कोंडी होवू नये यासाठी ही उपाययोजना केल्याचे सातपुते यांनी सांगितले. रायगडावर व पाचाड येथे जिल्हा प्रशासनातर्फे पाणी, वैद्यकीय सेवा, स्वच्छतागृहे आदि व्यवस्था करण्यात आली असल्याचेही प्रांताधिकारी सातपुते यांनी सांगितले.(वार्ताहर)