नेरळ : मासेमारीसाठी नदीपात्रात टाकलेल्या विद्युत प्रवाहाचा झटका लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. सीताराम काटे, हिरा काटे, सारिका काटे अशी मृतांची नावे आहेत. कर्जत तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पेज नदीपात्रात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. यात त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा समीर बचावला आहे.मूळचे भीमाशंकर येथे राहणारे काटे कुटुंब भालीवडी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या फार्महाऊसवर गेली अनेक वर्षे मोलमजुरीचे काम करत होते. फार्महाऊसचा मालक मुंबईत राहत असल्याने सीताराम काटे (५०), हिरा काटे (४५), मुलगी सारिका काटे (१७), मुलगा समीर (९) हे फार्महाऊसवरच राहायचे. फावल्यावेळेत हे कुटुंब मासेमारीचेही काम करायचे. गुरुवारी ते पेज नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले. मासेमारीसाठी ते विजेचा वापर करत असल्याने त्यांनी विद्युत प्रवाह पाण्यात सोडला होता. त्या वेळी सीताराम यांना विजेचा झटका लागल्याने ते जोरात ओरडले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीला व मुलीला सुद्धा विजेचा झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा बचावल्याचे येथील ग्रामस्थ अजय पिंगळे यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली.
कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 7:04 AM