धक्कादायक! मतदारयादीमध्ये बांगलादेशींचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 04:46 AM2018-08-30T04:46:06+5:302018-08-30T04:46:43+5:30
नांदगाव ग्रामस्थांचा आरोप : प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी
पनवेल : नांदगाव ग्रामपंचायतीच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. मतदार याद्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांचा समावेश करण्यात असल्याचा गंभीर आरोप बुधवारी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.
नांदगाव ग्रुपग्रामपंचायत असून सप्टेंबर महिन्यात या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. ३३00 मतदारांचा यामध्ये समावेश आहे. या मतदार यादीमध्ये सुमारे ४५0 मतदार बोगस असल्याचा गौप्यस्फोट माजी सरपंच व विद्यमान सदस्य मनोहर भोईर यांनी केला. मतदार याद्या शुद्धीकरणाचे उपक्र म राबवून देखील मोठ्या प्रमाणात बोगस मतदार या याद्यांमध्ये भरले आहेत. या मतदारांमध्ये परप्रांतीय, बांगलादेशीचा समावेश असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या मतदार याद्यांमध्ये २६१ स्थलांतरित, ४0 जणांचे दुबार तसेच १५0 विवाहितांचा समावेश आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने चौकशी करावी जोपर्यंत याद्यांचे शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. या वेळी सरपंच रेखा कातकरी, संदेश भगत, धनराज ठोंबरे, मनोहर भोईर, विक्र म फडके, शीतल खुटले, मीनाक्षी भोईर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दहा जणांवर कारवाई
च्नवी मुंबई, पनवेलमध्ये बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी कळंबोली व नेरूळमध्ये केलेल्या कारवाईनंतर एनआरआय पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये धाड टाकून दहा बांगलादेशींना अटक केली आहे. रेणू अब्दुल रशीद काझी, सुफियान अब्दुल रशीद काझी, जॉन अब्दुल रशीद काझी,बेगम शमतुला शेख, शमतुला ऐनूल शेख, रियाज शमतुल्ला शेख, मुस्लीमा अफसरअली मुल्ला, अफसरअली आकेरअल्ली मुल्ला यांचा समावेश आहे. हे सर्व करावे परिसरातील रहिवासी असून मूळचे बांगलादेशीमधील नोराईल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.
रहिवासी पुरावा व नागरिकत्वाचा दाखला या आधारावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नोंदविली जात असतात. नांदगाव ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांबाबतचे पुरावे आमच्याकडे सादर केल्यास नक्कीच चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
- दीपक आकडे,
तहसीलदार, पनवेल