धक्कादायक! किल्ले रायगडावर सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही ५ वर्षांपासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 06:24 IST2025-04-06T06:24:08+5:302025-04-06T06:24:26+5:30
येत्या १२ एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत.

धक्कादायक! किल्ले रायगडावर सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही ५ वर्षांपासून बंद
अलिबाग : रायगड किल्ल्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेले १५ सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या पाच वर्षापासून बंद आहेत. शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी १२ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाला दररोज शेकडो शिवभक्त, पर्यटक भेट देत असतात. या ऐतिहासिक स्थळी शिवराज्यभिषेक सोहळा, शिवपुण्यतिथी आदी मोठे कार्यक्रम होतात. येत्या १२ एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाचा आढावा मान्यवरांकडून घेण्यात आला असतानाच गडावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती उघड झाली आहे.
अमित शहा १२ एप्रिलला किल्ले रायगडावर
छत्रपती शिवाजी महाराजांची १२ एप्रिल रोजी ३६५ वी पुण्यतिथी आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गडावरील सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करणे प्रशासन, शासनाचे कर्तव्य आहे. मात्र किल्ले रायगडावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
किल्ले रायगडावर सीसीटीव्ही बंद आहेत, याबाबत कल्पना नव्हती. मात्र पुरातत्त्व संशोधन विभागाला त्वरित सूचना देऊन हे कॅमेरे सुरू करण्याची सूचना करतो. - संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार
पुरातत्त्व संशोधन विभागाकडून प्रतिसाद नाही
किल्ले रायगडाची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पुरातत्त्व संशोधन विभागाने सात-आठ वर्षांपूर्वी या गडाच्या परिसरात १५ सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र ते पाच वर्षांपासून बंद आहेत. बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत पुरातत्त्व संशोधन विभाग अधिकारी राजेश दिवेकर यांच्याशी संपर्क झाला नाही.