कर्जत : चार महिन्यांपूर्वी सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावे पाण्यामध्ये बुडाली होती. कर्जत नगरपरिषदेच्या आवाहनानुसार कर्जतमधील काही मित्रांनी सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी १८ हजार ५०० रुपयांची मदत धनादेशाद्वारे पोहोचवली होती. मात्र, अद्याप धनादेश त्यांना मिळालाच नाही; त्यामुळे तो धनादेश नक्की कुठे आहे याची विचारणा कर्जतमधील ‘त्या’ नागरिकांनी केली आहे. अनेक वेळा संबंधितांना पत्रव्यवहार करूनही याबाबत कोणतीच माहिती हाती लागत नाही. नक्की धनादेश कुठे गेला? याचा उलगडा अद्याप चार महिन्यानंतरही होत नाही.कर्जत नगरपरिषदेच्या आवाहनानुसार कर्जतमधील विजय हरिश्चंद्रे व त्यांचे मित्र यांनी १९ आॅगस्ट २०१९ रोजी पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी १८ हजार ५०० रुपयांचा धनादेश सांगली महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या नावे कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याकडे सादर केला होता; परंतु चार महिने झाले तरी त्यांच्याकडून धनादेश प्राप्त झालेल्याची पोचपावती मिळाली नाही, तसेच या धनादेशाची रक्कम माझ्या खात्यातून कमी झाल्याची बँकेच्या पासबुकमध्ये नोंदही नाही.याबाबत विजय हरिश्चंद्रे यांनी १२ डिसेंबर २०१९ रोजी कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना कळवले असता, त्यांनी सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कपडणीस यांचा भ्रमणध्वनी देऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार हरिश्चंद्रे यांनी आयुक्त यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला, त्या वेळी आयुक्त यांनी आमचे लेखा अधिकारी रजेवर आहेत. दोन दिवसांनी याबाबत आपणास कळवतो, असे सांगितले व संबंधित कर्मचारी यांचा दूरध्वनी क्रमांक देऊन तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगितले. हरिश्चंद्रे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अखेर हरिश्चंद्रे यांनी १६ डिसेंबर २०१९ रोजी सांगलीच्या महानगरपालिकेचे आयुक्त यांना लेखी पत्र पाठवून याबाबत कळविले. याबाबत त्वरित कळवावे अन्यथा मला माहितीच्या अधिकारात याबाबत विचारणा करावी लागेल, असे कळवले. त्याबाबत त्यांनी त्यांना पत्राद्वारे हा धनादेश या महानगरपालिकेत प्राप्त झालेला दिसून येत नाही, असे कळविले....हा प्रकार संतापजनक व निंदनीयपूरग्रस्त बांधवांचे अतोनात नुकसान झाले. घरदार, शेती उद्ध्वस्त झाली, अशा वेळेला आम्ही माणुसकीच्या भावनेने त्यांना अल्पशी मदत केली होती; परंतु ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, हा प्रकार संतापजनक व निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया हरिश्चंद्रे यांनी व्यक्त केली. त्याच्याबाबत चौकशी करून त्या धनादेशाचे नक्की काय झाले याची माहिती घ्यावी, अशी विनंती केली आहे.
धक्कादायक! पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचलीच नाही, कर्जतमधून पाठवलेला धनादेश गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 2:20 AM