धक्कादायक! कर्जतमध्ये रस्त्याअभावी महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:36 AM2017-11-21T02:36:58+5:302017-11-21T02:37:12+5:30
नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. ग्रामपंचायत हद्दीतील खाणींची वाडी या आदिम आदिवासी कातकरी समाजाच्या वाडीतील विवाहित महिला पिंकी मंगेश वाघमारे (२२) हिची तब्येत अचानक खालावली.
नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. ग्रामपंचायत हद्दीतील खाणींची वाडी या आदिम आदिवासी कातकरी समाजाच्या वाडीतील विवाहित महिला पिंकी मंगेश वाघमारे (२२) हिची तब्येत अचानक खालावली. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने तातडीने रु ग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र खाणींची वाडी ते बीड वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने या महिलेला चादरींची झोळी करून काही अंतर चालत न्यावे लागले. परिणामी त्वरित उपचार न मिळाल्याने या महिलेचा मृत्यू झाला.
येथील ग्रामस्थ मागील दहा-बारा वर्षांपासून बीड बु. ग्रुपग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामसभेत वाडीत ये-जा करण्यासाठी गाडीचा रस्ता करून देण्याचा ठराव मांडत आहेत, मात्र लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक या ठरावाला फारसे महत्त्व देत नाहीत. याच वाडीतील माजी सदस्या व सरपंच सुनीता वाघमारे यांनी वेळोवेळी मासिक सभेत व ग्रामसभेत ठराव घेऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. या वाडीत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने येथील आदिवासी खासगी जागेच्या मालकांच्या बांधावरून किंवा वन जमिनीतील याच रस्त्याने ये-जा करतात. शाळेत जाणारी लहान मुलेही याच बांधाच्या रस्त्याने बीड बुद्रुक गावातील शाळेत जातात.
येथील आदिवासींनी वनहक्क कायदा २००६ चे कलम ३(२)अंतर्गत बीड हायस्कूल ते खाणींची वाडी हा २४०० चौ.मी. लांबीचा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकारी कर्जत पंचायत समिती यांच्यामार्फत १0 फेब्रुवारीला कर्जत पूर्व वनाधिकारी यांच्याकडे दाखल करून आठ महिने उलटूनही रस्ता मंजूर केलेला नाही.