माणगाव शहरातील स्वस्तिक कॉम्प्लेक्समधील दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:28 AM2021-03-01T00:28:27+5:302021-03-01T00:28:32+5:30
महाड, रोहा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने मिळवले नियंत्रण
लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : शहरातील मुंबई-गोवा महामार्गानजीक असणाऱ्या मोतीराम प्लाझासमोर स्वस्तिक कॉम्प्लेक्समधील कॉटन किंग शोरुम शेजारी असणाऱ्या मोठ्या हायवा व मोठ्या गाड्यांचे स्पेअर पार्ट व ऑईल विक्रेते सद्गुरु स्पेअर पार्ट दुकानाला २७ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० च्या सुमारास अचानक आग लागली. माणगाव शहरात एकच हळकल्लोळ माजला होता, मात्र माणगाव प्रशासन व पोलीस प्रशासनाने योग्यवेळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
ही आग आटोक्यात आणण्याकरिता महाड नगरपरिषद व रोहा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने आग आटोक्यात आली. माणगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊन ५ वर्षे झाली. शहराचा विकास नगरविकास खाते करत आहे. माणगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे; पण अग्निशामक दल नाही. ही खंत आज प्रत्येक सुजान माणगावकर नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत होती. सुदैवाने तालुक्यातील घडलेल्या दोन्ही आपत्तीत जीवितहानी टळली असली तरी अग्निशमन दल माणगावला पोहोचण्यास १ तास वेळ लागतो. याकरिता माणगाव शहरास स्वतंत्र अग्निशमन दल द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. अशा आपत्तीतून प्रशासन व शासन यांनी माणगाव शहराकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी देखील होत आहे.