रायगडात पाच लाख लिटर दुधाचा तुटवडा; कृषीपूरक जोडधंद्याकडे फिरवली पाठ
By निखिल म्हात्रे | Published: December 18, 2023 01:18 PM2023-12-18T13:18:36+5:302023-12-18T13:18:41+5:30
रायगड जिल्ह्याची एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख होती. शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात औद्योगिकरण वाढले आहे.
अलिबाग - रायगड जिल्ह्यात कृषी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे, त्याचा फटका या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या कृषीपूरक जोड धंद्याला बसतो आहे. जिल्ह्याला दररोज 8 लाख 30 हजार लिटर दुधाची गरज आहे. मात्र केवळ 3 लाख 38 हजार लिटर दूध उत्पादित होत असल्याने सुमारे 5 लाख लिटर दूध पुणे, कोल्हापूर, नगर, गुजरात येथून रायगडमध्ये येते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कृषी क्षेत्रावर आधारित विविध उद्योगांची घसरण होऊ लागली आहे. कृषी क्षेत्रच कमी झाल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पर्यटन व्यवसायात संधी निर्माण झाल्याने तरुणवर्ग पर्यटन व्यवसायाकडे वळला आहे. याचा मोठा फटका येथील दुग्ध व्यवसायाला बसला असून मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी होत आहे.
रायगड जिल्ह्याची एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख होती. शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात औद्योगिकरण वाढले आहे. मोठमोठ्या औद्योगिक वसाहती जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे. शेती कमी झाल्याने हिरवा चारा उपलब्धता कमी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायही घटले आहे. मुंबई, पुण्यासारखी मोठी शहरे रायगड जिल्ह्यालगत असल्याने तरुण वर्ग नोकरीसाठी शहरात स्थलांतरित होत आहे. त्यामुळे कृषी व्यवसायाशी निगडित जोडव्यवसायही कमी झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात दिवसेंदिवस दुधाची टंचाई जाणवत आहे.
18 दूध उत्पादक सहकारी संस्था -
दूध उत्पादन वाढीसाठी सहकारी संस्था चांगले काम करतात. यासाठी राज्य सरकारकडून काही सवलतीही संस्थांना दिल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यात या साठी वेगळ्या कार्यालयाची निर्मिती केली आहे. परंतु रायगड जिल्ह्यात या कार्यालयाचे काम बसण्यात जमा आहे. जिल्ह्यात दुग्ध संकलन करणाऱ्या नोंदणीकृत 135 सहकारी संस्था आहेत. त्यातील 18 कार्यरत असून त्यांच्याकडून 1573 प्रतिदिन दूध संकलन होते. यात अवसायानात निघालेल्या 117 संस्था आहेत.
लोकसंख्येच्या तुलनेत पशुधन कमी -
जिल्ह्यामध्ये देशी गायी, संकरित गायी आणि म्हैसवर्गीय जनावरांची एकूण संख्या 2 लाख 39 हजार 131 आहे. यातील 30 टक्के जनावरे दूध देणार आहेत. या जनावरांद्वारे दररोज एकूण 3 लाख 37 हजार 977 लिटर दूध उपलब्ध होते. जिल्ह्याला दररोज 8 लाख 29 हजार 773 लिटर दुधाची गरज आहे. रायगड जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणेप्रमाणे 26 लाख 34 हजार आहे. दहा-बारा वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या वाढली आहे. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुधाची मागणी प्रचंड वाढली आहे.
दूध उत्पादन देणारे पशुधन -
देशी गायी- 1,70,388 (दुभत्या 51,116), दूध उत्पादन- 2,04,464
संकरित गायी – 6,518 (दुभत्या 1955), दूध उत्पादन- 21,505
म्हैस वर्ग – 62,225 (दुभत्या 18,668), दूध उत्पादन – 1,12,008
एकूण- 2,39,131 (दुभती- 71,739), दूध उत्पादन – 337977