मुंबई : लॉकडाऊन काळात गैरहजर राहणे पेणच्या एआरटीओ उर्मिला पवार यांना महागात पडले असून पनवेल आरटीओने पवार यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २२ मार्चला लॉकडाऊन करण्यात आला. राज्यातील मालवाहतूक, आपत्कालीन सेवा, जीवनावश्यक वस्तू आणि वाहनांच्या समस्या उद्भवू नयेत, असे परिवहन आयुक्तांचे आदेश होते. या काळात पेणच्या एआरटीओ उर्मिला पवार मुख्यालयात न राहता पुण्यातील कोथरूड येथील त्यांच्या घरी मुक्कामाला होत्या.
मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत पेणच्या एआरटीओ उर्मिला पवार या कर्तव्यावर नव्हत्या. दोन महिने पुण्यातील त्यांच्या मूळगावी राहायला होत्या, त्यांनी विनापरवानगी रेड झोन ते ग्रीन झोनमध्ये प्रवास केला, अशी तक्रार शेकाप आमदार भाई जयंत पाटील यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. त्यावरून पनवेलच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी पवार यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यावरून एक चौकशी अहवाल लवकरच परिवहन आयुक्त कार्यालयाला पनवेल आरटीओ अधिकारी सुपूर्द करणार आहेत.अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईलॉकडाऊन काळात मार्च आणि एप्रिल महिन्यात गैरहजर राहिल्याप्रकरणी पेण एआरटीओ उर्मिला पवार यांना पनवेल आरटीओ हेमांगी पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी पाटील यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. - शेखर चन्ने, परिवहन आयुक्त