पाली : निधी आणण्यासाठी मेंदू तल्लख असावा लागतो व हृदयात ग्रामीण भागातील जनतेविषयी प्रेम असावे लागते. काहींचा वरचा मजला रिकामा आहे तर हृदयात निष्प्रभता आहे. आमच्या दोन्हीही गोष्टी शाबूत आहेत, म्हणूनच आम्ही नांदगाव विभागात कोट्यवधींची विकासकामे केली आहेत, म्हणूनच मी येथील जनतेला आव्हान करतो की, गीतेंचे एकतरी काम दाखवा व दोन हजार रु पयांचे बक्षीस मिळवा, असे प्रतिपादन रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे) गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केले.
सुधागड तालुक्यातील पाली जिल्हापरिषद गटातील नांदगाव येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी मेक इन इंडिया, अच्छे दिन, पंतप्रधानांच्या घोषणा, यावर सडकून टीका केली. सभेला दोन तास उशिरा पोहोचूनही उपस्थितांची एवढी गर्दी पाहून सुनील तटकरे यांनी सुरेश खैरेंच्या प्रेमापोटी जनता उपस्थित असल्याचे आवर्जून नमूद केले. या वेळी शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांनी अनंत गीते यांचा खरपूस समाचार घेतला. आम्ही मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करून नारळ फोडण्याचे काम शिवसेना-भाजपवाले करीत आहेत. त्यामुळे खऱ्या विकासकामांच्या पूर्ततेसाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी सुनील तटकरे यांना निवडून देऊ आणि त्यात पेण-सुधागड विधानसभा मतदारसंघाचा भरीव वाटा असेल, असे आश्वासन आ. धैर्यशील पाटील यांनी दिले. या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिरु द्ध कुलकर्णी, राष्ट्रवादीचे जिल्हासंघटक अनुपम कुलकर्णी आदीसह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.