वाड्यांमध्ये रस्ते दाखवा, बक्षीस मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:21 PM2018-11-27T23:21:29+5:302018-11-27T23:22:29+5:30
ग्रामस्थांची घोषणा : रस्त्याअभावी दैनंदिन व्यवहारात अडचणी; प्रशासनाकडून वर्षानुवर्षे दुर्लक्षच
- कांता हाबळे
नेरळ : मुंबई आणि उपनगरांमध्ये ‘खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळावा’ अशी घोषणा करण्यात आली होती; परंतु कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील १५ आदिवासी वाड्यांंमध्ये ‘डांबरी रस्ते दाखवा आणि बक्षीस मिळावा’ अशी घोषणा ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीमधील बेकरेवाडी, आसलवाडी, नाण्याचा माळ, भुतिवलीवाडी, बोरीची वाडी, सागाची वाडी आदी वाड्यांंमधील आदिवासी बांधवांना वर्दळीसाठी रस्ते नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावरील माती वाहून जात असल्याने केवळ दगड-गोटे जमा होतात.
बेकरेवाडी ते जुमापट्टी या दोन ते अडीच कि.मी.पर्यंत ये-जा करताना आदिवासी बांधवांना कसरत करावी लागते. एखादा रु ग्ण गंभीर असले तर त्याला आजही झोळीचा वापर करून न्यावे लागते. आदिवासी बांधव दरवर्षी आदिवासी श्रमदानातून कच्चा रस्ता तयार करतात. मात्र, पावसाळ्यात तो वाहून जातो. लोकप्रतिनिधी अथवा स्थानिक प्रशासनाने मात्र अद्याप या आदिवासीवाड्यांना रस्त्यासारखी मूलभूत सुविधाही पुरवलेली नाही.
थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. वर्षभर लाखो पर्यटक माथेरानला येत असतात; परंतु माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीवाड्या मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. वनविभागाची जागा असल्याचे कारण संबंधित अधिकारी पुढे करतात.
आठ वर्षे श्रमदानातून बांधले रस्ते
सतत आठ वर्षे येथील आदिवासी बांधव श्रमदान करून रस्ते करत आहेत. मागील वर्षी अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली; परंतु अद्याप रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम केले नाही. हे रस्ते डोंगर-दºयातील असल्याने दैनंदिन व्यवहारातही आदिवासींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. घरगुती साहित्य, अन्य सामान डोक्यावर घेऊन जावे लागत आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर आदिवासीवाड्यांतील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.