अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध क्लृप्त्या लढविल्या आहेत. यामध्ये आता हाॅटेल व्यावसायिक सहभागी झाले आहेत. बोटाला मतदान केल्याची शाई दाखवा आणि १० टक्के डिस्काउंट मिळवा, अशी योजना अलिबाग शहरातील प्रमुख हाॅटेल व्यावसायिकांनी तयार केली आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी अलिबाग शहरातील हाॅटेल व्यावसायिकांची बैठक घेतली होती. त्यामध्ये लोकशाहीचा जागर करीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हाॅटेल व्यावसायिकांना सहभागी केले.
मतदान करा, शाई दाखवा आणि हाॅटेलमध्ये १० टक्के सूट मिळवा अशी संकल्पना हाॅटेल व्यावसायिकांची आहे. ७ ते १० मे २०२४ पर्यंत अनेक हाॅटेलमध्ये जेवणावर १० टक्के सूट मिळणार आहे. सर्वांनी आपल्या बहुमोल मताचा हक्क बजवावा आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी असा उपक्रम हाती घेतला आहे.७ मे २०२४ रोजी सकाळपासून ही संधी खुली असेल. त्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आपण विविध संकल्पना राबवित आहोत. त्यातच येथील नागरीकांना हाॅटेलींग अवडत असल्याने त्याकडे फोकस करून हि संकल्पना राबविली आहे. जेणे करून मतदानाचा टक्का वाढेल.- विक्रम पाटील, अलिबाग तहसिलदार.