बंधा-यांच्या दुरुस्तीचे काम दुस-या दिवशीही सुरू, 300 शेतक-यांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:04 AM2018-02-10T03:04:47+5:302018-02-10T03:04:55+5:30
शुक्रवारी सूर्य उगवला आणि शहापूर-धेरंडमधील प्रत्येक घरातील एक स्त्री वा पुरुष शेतकरी आपल्या घरचे फावडे, कुदळ, घमेले आणि दुपारच्या जेवणासाठी भाजी-भाकरी सोबत घेऊन गावांच्या किनारी भागातील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीकरिता श्रमदान करण्याकरिता निघाले होते.
अलिबाग : शुक्रवारी सूर्य उगवला आणि शहापूर-धेरंडमधील प्रत्येक घरातील एक स्त्री वा पुरुष शेतकरी आपल्या घरचे फावडे, कुदळ, घमेले आणि दुपारच्या जेवणासाठी भाजी-भाकरी सोबत घेऊन गावांच्या किनारी भागातील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीकरिता श्रमदान करण्याकरिता निघाले होते. श्रमदान करण्यासाठी निघालेला हा प्रत्येक जण गुरुवारी केलेल्या दिवसभराच्या श्रमदानाने खरेतर पूर्णपणे थकून गेला होता; परंतु आपल्याच गावाच्या आणि आपल्याच कुटुंबाच्या बचावासाठी दुसºया दिवशीदेखील न थकता श्रमदान करणे अपरिहार्य असल्याने कुणाच्याही कपाळावर तक्रारीची आठी नव्हती.
समुद्र संरक्षक बंधाºयांची कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे; परंतु गावातील सर्व शेतकºयांची जॉब कार्ड तयार नसल्याने, कामास शासकीय मंजुरी मिळण्याची प्रक्रिया झालेली नसल्याने, प्रत्यक्ष रोजगार हमी योजनेतून कामे सुरू होण्यास अद्याप काही कालावधी लागणार आहे. मात्र, येत्या गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी असलेल्या अमावास्येपूर्वी सद्यस्थितीतफुटलेल्या संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती (खांडी बुजविणे) केली नाही, तर पुन्हा गुरुवारी अमावस्येच्या उधाणाला समुद्राचे पाणी भातशेती पार करून थेट गावात आणि घरांत घुसण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सारे ३०० स्त्री-पुरुष शेतकरी ग्रामस्थ गुरुवारपासून श्रमदान करून फुटलेले संरक्षक बंधारे दगड-चिखलमाती घालून बुजवण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत.
शुक्रवारी मोठे शहापूर गावांच्या धरमतर खाडीकिनारच्या मोठ्या संरक्षक बंधाºयास पडलेली भगदाडे दरड-माती चिखल यांनी भरून काढून हा बंधारा दुरुस्त करण्यात आल्याची माहिती श्रमिक मुक्तिदलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुरुवार व शुक्रवार अशा दोन दिवसांतील ३०० स्त्री-पुरुष शेतकºयांच्या श्रमदानातून बंधारे दुरुस्तीचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बंधारे दुरुस्तीकरिता शनिवारीदेखील श्रमदान करावे लागणार असल्याचे भगत यांनी सांगितले.