निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग: श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून जिल्ह्यातील निराधार नागरिकांना जीवन जगण्यासाठी बळ मिळत आहे. रायगड जिल्ह्यात १३,४०१ कुटुंबातील निराधारंना ६६ कोटी ३९ लाख १ हजार ३०० रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले. शासनाच्या अनोख्या योजनांमुळे निराधारांना जगण्यासाठीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्ह्यातील निराधार, वयोवृद्ध नागरिकांसाठी असलेली श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना जगण्याचा एक नवा मार्ग बनली आहे. या योजनेत ४००, ६०० आणि ९०० याप्रमाणे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात अनुदान दिले जात आहे. या अनुदानामुळे नागरिकांना जगण्याचा आधार मिळत आहे. या योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाने जानेवारी २०२० ते डिसेंबर, २०२० अखेरपर्यंत पंधरा तालुक्यातील लाभार्थ्यांना ५६ कोटी २ लाख ४० हजार रुपयांचे आनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यातच वाटप केले आहे. पेण तालुक्यात लाभार्थ्यांची संख्या सार्वाधिक, तर सर्वात कमी तळा तालुक्यात या योजनेचे लाभार्थी आहे. जानेवारीपर्यंत ६६ कोटी ३९ लाख १ हजार ३०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना वितरित केले आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत येत असलेल्या योजनांमुळे समाजातील निराधारांना आधार मिळाला.
हयातीचा दाखला असल्याच निराधारांचे कामश्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन उपक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने वयाचा दाखला, रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा वा जिल्हा शल्यचिकित्सक दाखला घेऊन अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी/ तहसीलदार कार्यालयात जमा करावा, तसेच किमान १५ वर्षांपासून महाराष्ट् राज्याचा रहिवासी असणे आवश्यक. शासनाच्या अन्य कोणत्याही मासिक लाभ योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
सरकारच्या योजनांमुळे जगण्याला आधार मिळाला आहे. आमच्यासारख्या निराधारांना या योजनेचा लाभ मिळाल्याने डोक्यावरील थोडा भार कमी आहे.- मंगला कंटक, लाभार्थी
लाभार्थ्याचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी, कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१ हजारपर्यंत असणाऱ्या लाभार्थ्यास दरमहा ६०० रुपये (केंद्र शासन २०० रु व राज्य शासन ४०० रु.) प्रमाणे दिले जाते.