श्रावणी सोमवारीही घारापुरी बेटावरील लेण्या बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:38 AM2017-08-07T06:38:59+5:302017-08-07T06:38:59+5:30
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळते. मात्र घारापुरी बेटावरील हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या अतिप्राचीन शिवलिंगाचे प्रवेशद्वार सोमवारीच बंद ठेवले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळते. मात्र घारापुरी बेटावरील हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या अतिप्राचीन शिवलिंगाचे प्रवेशद्वार सोमवारीच बंद ठेवले जात आहे. पुरातत्व विभागाच्या आडमुठे धोरणामुळे बेटावर येणाºया हजारो देशी-विदेशी पर्यटक भाविकांना शिवदर्शनाला मुकावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींकडूनही दुर्लक्षच होत असल्याने शिवभक्तांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घारापुरी बेटावर कलचुरी घराण्याच्या कारकिर्दीत कोरण्यात आलेल्या इ. स. सहाव्या शतकातील अतिप्राचीन कोरीव लेण्या आहेत. काळ्या पाषाणात योगेश्वर शिव, रावणानुग्रहमूर्ती, शिवपार्वती अक्षक्रीडा, अर्धनारीनटेश्वर, गंगावतरण शिव, शिवपार्वती विवाह, अंधकारवरधमूर्ती, नटराज शिव आणि महेशमूर्ती अशी शिवाची विविध रूपे या शिल्पात अद्भुतरीत्या कोरलेली आहेत. याबरोबर लेणी परिसरातील विविध गाभाºयात अतिप्राचीन चार शिवलिंगे आहेत. त्यापैकी लेण्यांच्या पश्चिमेला पण पूर्वाभिमुख शिवमंदिर सुमारे २० चौ. मी. छतापर्यंत भिडलेले आहे. मंदिरात चौकोनी शाळुंका असून अगदी तिच्या मधोमध विशाल शिवलिंग आहे. त्या शिवमंदिरासमोरच महाकाय सदाशिवमूर्ती (महेशमूर्ती) आहे. पर्यटकांसाठी सदाशिवमूर्तीच घारापुरी लेण्यांचे मुख्य आकर्षण आहे. शिवाची सकल आणि निष्लंक अशी दोन रूपे आढळतात. अशी ही शिवाची अद्भुत शिल्पे पाहण्यासाठी देश-विदेशी पर्यटकांची वर्षभर नेहमीच गर्दी असते. मात्र वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या घारापुरी लेण्या प्रत्येक सोमवारी घारापुरी लेणी पर्यटकांसाठी बंद ठेवली जाते. पुरातन विभागाकडून दुरुस्ती, देखभालीसाठी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी लेण्या पाहण्यासाठी बंद ठेवल्या जात असल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी आहे. प्रत्येक सोमवारी घारापुरी लेण्या पाहण्यासाठी बंद ठेवण्यात येत असल्या तरी मुंबई गेटवे आॅफ इंडिया येथून हजारो पर्यटकांची फसवणूक करीत प्रवासी लाँचेस पर्यटकांना घेवून बेटावर येतात. मात्र लेण्या पाहण्यासाठी बंद असल्याने हजारो शिवभक्त पर्यटकांना शिवदर्शनास मुकावे लागत आहे. यामुळे किमान श्रावणातल्या सोमवारी शिवदर्शनासाठी पुरातत्व विभागाने लेण्यांचे प्रवेशद्वार पर्यटक शिवभक्तांसाठी खुले करावे, अशी मागणी घारापुरी बेटवासीयांची आहे. अजिंठा, वेरुळप्रमाणे घारापुरी बंदचा दिवस बदलण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर आणि ग्रामस्थांची आहे. यासाठी त्यांनी खा. श्रीरंग बारणे, उरण आ. मनोहर भोईर यांनाही निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे खासदार, आमदारांसह पुरातत्व विभागाकडून दुर्लक्षच केले जात आहे.