लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : कोकणातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमूर्तीची पुनप्रतिष्ठापना लवकरच होण्याची चिन्हे आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी श्री गणेशमूर्तीच्या पुनर्घडणावळीसाठी जाहीर नोटीस देत मूर्ती घडवण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे मूर्ती स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने दिवेआगारातील पर्यटनाचा प्रारंभ होणार आहे.
दिवेआगरच्या श्री सुवर्ण गणेशाचा मुखवटा घडविणे व प्रतिष्ठापना करण्यासाठीचा ताबा सुवर्ण गणेशमंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यासाठी शासनस्तरावर कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत सोने देऊन लवकरात लवकर कारागिरांकडे मूर्ती बनवून घेण्यात येणार असल्याचे निर्देश दिले गेले होते. या निर्णय प्रणालीचा पुढील भाग म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी श्री गणेश मुखवट्याच्या पुनर्घडणावळीसाठी राज्यातील नामांकित सोनारांकडून प्रस्ताव मागविले आहेत.
जिल्हाधिकारी रायगड यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या फोटोसारखा हुबेहूब मुखवटा असावा, मूर्तिकारांनी श्री गणेश मुखवटा एक सामाजिक किंवा धार्मिक कार्य म्हणून बनवून देण्याची तयारी असावी, सुवर्णकारांनी मूर्ती बनवण्यापूर्वी नमुना मुखवटा बनवून जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी. नमुना मुखवट्याला परवानगी दिल्यानंतर सोने घेऊन हुबेहूब मूर्ती बनवायची आहे.
मुखवटा बनवताना होणार चित्रीकरणश्री गणेश मुखवटा हा श्रीवर्धन येथील उपविभागीय अधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध सोने शिवाय इतर कोणत्याही धातूची किंवा सोन्याची भर न घालता मुखवटा बनविला जाणार असून, त्याचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे.