कर्जत : मावळ लोकसभा मतदारसंघात पुत्रप्रेमापोटी अजित पवार झोपले नाहीत. राज्यातील मतदारसंघ बाजूला ठेवून मावळमध्ये बसून होते. तरीदेखील त्यांचा पराभव झाला. मतदारांच्या पाठिंब्यामुळेच पुन्हा खासदार झालो असून यात युतीच्या कार्यकर्त्यांची साथ मोलाची असल्याचे विचार खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जमध्ये व्यक्त केले.
कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित शहरातील सत्कार सभारंभात ते बोलत होते. आगामी काळात सर्व एकत्र बसून काम करणार आहोत आणि कर्जत तालुक्यातील विकासकामे करताना भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयला समान निधी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. राष्ट्रवादीला साथ देणारा शेकाप हा नेस्तनाबूत झाला आहे. रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मनोहर भोईर यांनी, खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय हा महायुतीचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यामुळे झाला असून आघाडी दिली नाही म्हणून नाराज होऊ नका, असे आवाहन केले.सत्कार सोहळ्याला मुंबई महापालिकेचे माजी महापौर दत्ता दळवी, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, शिवसेना मतदारसंघ अध्यक्ष संतोष भोईर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, आदी उपस्थितीत होते.