पनवेल : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवारी सेनेच्या खारघर शहरातील मध्यवर्ती कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी बारणे यांना साकडे घातले.लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडल्यानंतर प्रथमच खासदार बारणे यांच्यामार्फत जनतेच्या भेटीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात खारघर, कामोठे, पनवेल, शहर पनवेल - ग्रामीण आदी भागांतील रहिवाशांनी आपली हजेरी लावली होती. पनवेल महापालिकेचे शेकापचे नगरसेवकदेखील उपस्थित होते.जनता दरबारात विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची संख्या उल्लेखनीय होती. शहरातील वाचनालये, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे आदी प्रश्नांबाबत खासदारांकडे गाºहाणे मांडले. पालिका क्षेत्रातील गटई कामगारांचा प्रश्नदेखील या वेळी खासदारांकडे मांडण्यात आला. पनवेल तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत आपटा येथील कोरलवाडी आदिवासी वाडीत अद्यापही प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. यासंदर्भात ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी बारणे यांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली. शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत हरित लवादाने संबंधित वेगवगेळ्या प्रशासनाला योग्य ते आदेश दिले असल्याचे सांगितले. या वेळी कासाडी नदीला पुनर्जीवित करण्यासाठी हरित लवादाने आदेश देऊनदेखील नदीच्या पुनर्जीवित करण्याच्या कामाला टाळाटाळ केली जात असल्याचे म्हात्रे यांनी खासदारांना सांगितले.तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाचा विषय लोकसभेत उपस्थित केला जाईल, असे आश्वासन या वेळी बारणे यांनी दिले. कामोठे शहरातील समस्यांसंदर्भात कफच्या सदस्य रंजना सडोलीकर यांनीदेखील खासदार बारणे यांच्याशी संवाद साधला. या वेळी जिल्हा प्रमुख शिरीष घरत, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रामदास पाटील, भरत पाटील, दीपक निकम, राकेश गोवारी, मनेश पाटील आदी उपस्थित होते. बारणे यांनी, उपस्थितांचे प्रश्न, समस्या ऐकून घेत यासंदर्भात वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन भविष्यातदेखील केले जाईल, असे बारणे यांनी स्पष्ट केले.
विविध समस्या सोडविण्यासाठी श्रीरंग बारणे यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:52 PM